‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:08 IST2020-01-04T15:08:26+5:302020-01-04T15:08:51+5:30
‘ सेवा संकल्प’चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे यांच्याशी साधलेला संवाद.

‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: समाजातील संवेदनशीलता संपुष्टात आल्याने, समाजात बेसहारा आणि मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब समाजासाठी निश्चितच भूषणावह नाही. मनोरूग्णच्या सेवेतच आपणांस ईश्वराची सेवा घडते. ‘ सेवा संकल्प’चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे यांच्याशी साधलेला संवाद.
‘सेवा संकल्प’ या मानवतेच्या मंदिराची संकल्पना कशी सुचली?
- सन २००६-२००७ मध्ये चिखली येथे शिक्षणासाठी जात होतो. बसस्थानकावर ‘माउली’ हा मनोरूग्ण भेटायचा. त्याला आणि इतरांना जेवण आणि इतर सुविधा देत होतो. तेव्हा बेसहारा असलेल्या शर्मा आजीने जेवण आणि सर्व सुविधा देतो. निवाराही मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. मनोरूग्णांच्या प्रेरणेने ७ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘सेवा संकल्प’ची मुहूर्तमेंढ रोवल्या गेली. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते या सेवाभावी प्रकल्पाला सुरूवात झाली.
‘सेवा संकल्प’मध्ये सद्यस्थितीत रूग्णांची संख्या किती?
- समाजातील बेवारस, दिव्यांग, मनोरूग्ण अनाथ आणि एचआयव्ही बाधीत थोडक्यात समाजातील उपेक्षीत व्यक्ती हाच ‘सेवा संकल्प’चा प्रमुख घटक आहे. सद्यस्थितीत राज्याच्या कानाकोपºयातील ७७ रुग्ण येथे वास्तव्यास आहेत. यामध्ये मनोरूग्ण आणि बेवारस असलेल्यांचा समावेश आहे.
‘सेवा संकल्प’मध्ये आपणा कुणाची मदत मिळते?
- शिक्षण घेत असताना वयाने मोठी आणि मैत्री आणि पुढे सहचरणी असलेल्या डॉ. आरतीचे योगदान या कार्यात मोठे आहे. वडिल ज्ञानेश्वर पालवे यांनीही या प्रकल्पासाठी १ एकर १० गुंठे जमीन दिली. तेथेच सन २०१५ मध्ये सेवा संकल्प परिवार वसला आहे. आई आणि मुलगा रूद्र याच्यासह काही स्वयंसेवक मोलाची मदत करतात.
थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्यामते मनुष्य विचारी असला की, गुंतलेला राहतो. याउलट ‘अविचारी’ व्यक्ती आपले ध्येय सिध्दीस नेण्यासाठी प्रयत्नशील राहतो. ‘सेवा संकल्प’चा कोणताही संकल्प केला नव्हता. मात्र, एका मनोरूग्णाच्या प्रेरणेतून समाजाची सेवा करण्याची संधी मिळतेय.
मनोरूग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल आपले मत काय?
- समाजातील एकलकोंडे पणा आणि कुटुंब व्यवस्थेचा ºहास ही दोन प्रमुख कारणं समाजातील मनोरूग्णांच्या संख्येत भर घालताहेत, असे आपले प्रामाणिक मत आहे. मनोरूग्ण पूर्वीही असायचे. प्रत्येक गावात तसेच वस्तीत मनोरूग्ण रहायचे. मात्र, एकत्र कुटुंब पध्दतीत त्यांना सामावून घेतले जायचे. संवेदनशीलतेने त्यांची जोपासना व्हायची. मात्र, विभक्त कुटुंब पध्दतीत ‘संवेदना’घराबाहेर फेकल्या गेल्या. मनोरूग्णांची उपयोगीता, उपद्रव्यमुल्य संपले आणि मनोरूग्ण अडगळीत पडले. विभक्त कुटुंब पध्दतीत कुटुंब लहान झाल्याने मानसिक आजारात आणि पयार्याने मनोरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.