‘त्या’ लघू व्यावसायिकांचा सर्व्हे!
By Admin | Updated: December 23, 2015 02:22 IST2015-12-23T02:22:35+5:302015-12-23T02:22:35+5:30
बुलडाणा येथील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग.

‘त्या’ लघू व्यावसायिकांचा सर्व्हे!
बुलडाणा : अतिक्रमकांना कायमस्वरूपी गाळे मिळवून देताना कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेवर ४00 लघू व्यावसायिकांचा सर्व्हे करण्यात आला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या ४0 विद्यार्थ्यांंनी सहभाग घेतला. त्यावेळी अतिक्रमकांनी स्वत: सर्व्हेचे अर्ज भरून दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ३ डिसेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहीम वर्षभर चालणार आहे; मात्र अतिक्रमण काढल्यामुळे अनेक लघुव्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ना नफा, ना तोटा या माध्यमातून गाळे बांधून देण्यात येणार आहेत. त्यामुळे लघू व्यवसायिकांचा त्यांच्या अतिक्रमण केलेल्या जागेवरच सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या ४0 विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. हा सर्व्हे चार दिवस सुरू राहणार असून, पहिल्या दिवशी २२ डिसेंबर रोजी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या चार चमूने जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद कार्यालय परिसर, जनता चौक तसेच चिखली रस्त्यावरील अतिक्रमकांचा सर्वे केला.