रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव पाठवा- चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:59+5:302021-02-05T08:34:59+5:30
यासोबतच आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात ...

रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव पाठवा- चव्हाण
यासोबतच आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच सिंदखेडराजा मतदारसंघातील प्रस्तावित २८ कोटी रुपयांचे रस्ते व पुलांची कामे केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या विविध प्रस्तावासंदर्भात डॉ. शिंगणे यांच्या विनंतीनुसार २८ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. डॉ. शिंगणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, अनिल गायकवाड सचिव (बांधकामे) यांच्यासह अमरावती विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.
सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते, पुल व इमारतींचा समावेश केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, विशेष दुरुस्ती कार्यक्रम या विविध योजनेमध्ये करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केली. यामध्ये आशियाई विकास बँके अंतर्गत ५ कोटी ४३ लाख रकमेची चार रस्त्यांची सुधारणा, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २८ कोटी ७० लाख किमतीची सुमारे १४ कामे तसेच नाबार्ड अंतर्गत १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या १० कामांचा समावेश आहे. आगामी अर्थसंकल्पात राज्यमार्गाची चार कामे, प्रमुख जिल्हा मार्गाची १२ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
दुसरीकडे ना. अशोक चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँक निधीअंतर्गत प्रस्तावित अमडापूर-लव्हाळा-दुसरबीड-राहेर- वर्दडी ते जालना जिल्हा सीमा रस्ता आणि शेंदुर्जन-राजेगाव-सुलतानपूर-वेणी-गुंधा-हिरडव-वढव ते वाशिम जिल्हा हद्द या दोन्ही रस्त्यांचा समावेश करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार केला जाईल. तसेच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत या मतदारसंघातील जास्तीतजास्त कामे घेण्यात येतील. सिंदखेडराजा येथील पर्यटन विभागाकडे असलेल्या विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर त्या विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्यात येईल. तसेच देऊळगाव मही येथील विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश ना. चव्हाण यांनी यावेळी दिले.
(फोटो)