चिखली : स्थानिक अनुराधा गृप ऑफ फार्मसी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्यावतीने बिकन सिरीज अंतर्गत दुसरा वेबिनार 'फार्मा मार्केटिंग मध्ये नोकरीच्या संधी' या विषयावर पार पडले. यामध्ये कॉलेजचे माजी विद्यार्थी तथा अल्कॉन ऑप्थॅलमिक कंपनी लखनौचे एरिया सेल्स मॅनेजर संदीप शेळके यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. बियाणी यांनी परिचय दिला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३०० विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बियाणी, प्राचार्य डॉ.आर.एच. काळे, प्राचार्य डॉ.आर.आर. पागोरे, डॉ. उप्पलामोहन कुमार, प्रा.पवन फोलाने आदींनी सहभाग नोंदविला. या चर्चासत्रात संदीप शेळके यांनी मार्केटिंग आणि सेल्सबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच क्लिनिकल रिसर्च, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, क्वॉलिटी कंट्रोल अॅण्ड प्रॉडक्शन, ड्रग्ज्स् इन्स्पेक्टर, सांयटिफिक रायटर, सेल्स मार्केटिंग कम्युनिटी फार्मसी, स्पर्धा परीक्षा, अॅकॅडेमिक्स या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच मुलाखतीबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संचालन व आभार ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा.यू.एम.जोशी यांनी मानले.