चोरट्या मार्गाने दारु विक्री!
By Admin | Updated: April 8, 2017 00:16 IST2017-04-08T00:16:51+5:302017-04-08T00:16:51+5:30
खामगाव : सर्वोच्च न्यायालयाने दारु विक्रीस बंदी घातल्याने चोरट्या मार्गाने दारुची विक्री सुरु झाली असून, त्यामुळे मद्यपींची पंचाईत झाली आहे.

चोरट्या मार्गाने दारु विक्री!
काळाबाजारामुळे भावही वाढले : मद्यपींची पंचाईत
खामगाव : सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील दारु विक्रीस बंदी घातल्याने शहर व परिसरातील ३० बार, ८ देशी दारुची दुकाने व ४ वाइनशॉप अशी एकूण ४० दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे पिणाऱ्यांची गैरसोय होत असून, बंदीतून वाचलेल्या दुकानांवर मात्र चांगलीच गर्दी होत आहे. दुसरीकडे चोरट्या मार्गाने दारुची विक्री सुरु झाली असून, काळ्या बाजारात दारु चढ्या भावाने विकत घ्यावी लागत आहे, त्यामुळे मद्यपींची पंचाईत झाली आहे.
देशातील राष्ट्रीय व राज्यमहामार्गांवरील दारु विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालून मार्चअखेरीस जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करु नये व नव्याने परवाने देऊ नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून संपूर्ण देशातील महामार्गांवरील दारुची दुकाने, वाइन शॉप, वाइन बार आदी बंद झाले आहेत. यात खामगाव शहरासह परिसरातील ४२ दुकानांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ हा खामगाव शहरातून गेलेला असल्याने व बहुतांश दुकाने याच रस्त्यावर असल्याने त्यांच्यावर संक्रांत ओढवली. केवळ बोटावर मोजण्याइतपत दुकाने यातून वाचली आहेत. त्यामुळे या दुकानांवर मद्यपींची चांगलीच गर्दी होताना दिसते. दुसरीकडे दारु सहजासहजी मिळणे दुरापास्त बनल्याने काळाबाजारही सुरु झाला. यात चढ्या भावाने दारुची खरेदी करावी लागत असल्याने हुई महंगी बहुतही शराब... थोडी...थोडी पिया करो...असे म्हणण्याची पाळी मद्यपींवर आली आहे.