संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात
By Admin | Updated: April 14, 2017 00:28 IST2017-04-14T00:28:57+5:302017-04-14T00:28:57+5:30
सिंदखेडराजा येथून सुरुवात: दोन हजारावर शेतकरी मोटारसायकलने सभेस राहणार उपस्थित- आ.बोंद्रे

संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात
चिखली : शेतकऱ्यांना न्याय देणारा स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी शासनाकडून होणारी दिरंगाई, शेती क्षेत्रातील विविध समस्या वाढलेल्या असताना व मागिल तीन वर्षे दुष्काळी स्थितीने शेतकरी पिचलेला असताना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी शासनाकडून होणारी चालढकल, या प्रश्नावर केल्या जाणारा शब्दच्छल आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर राजकारण या विरोधात पहिल्या टप्प्यातील १६ जिल्ह्यांचा २५०० किलोमीटर अंतराच्या संघर्ष यात्रेनंतर दुसरा टप्प्यातील संघर्ष यात्रेस १५ एप्रिलपासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महराज यांचे आजोळ, राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून प्रारंभ होणार आहे़ या संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन चिखलीचे आमदार राहुल बोंदे्र यांनी केले आहे.
यात्रा सिंदखेडराजा येथून सुरू होऊन बुलडाणा जिल्हा, जळगाव खान्देश, धुळे शिरपूर, नंदुरबार, मालेगाव, नाशिक मार्गे शहापूर येथे सभा घेऊन ठाणेपर्यंत जाणार आहे़ या संघर्ष यात्रेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष, एमआयएम या पक्षासह शेतकरी संघटनेचाही सहभाग राहणार आहे़ दरम्यान, सिंदखेडराजा व बुलडाणा येथे सभा आयोजित करण्यात आल्या असून, या सभेसाठी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राजीव सातव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, राष्ट्रवादी कॉगे्रसचे नेते अजित पवार,, सुनिल तटकरे, समाजवादी पक्षाचे अबु आजमी, रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे, जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यस्तरीय नेते व सहभागी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंदखेडराजा येथील सभेनंतर प्रारंभ होणारी ही संघर्ष यात्रा चिखलीकडे प्रयाण करेल, चिखली येथून बुलडाणा जाताना या यात्रेत चिखली तालुक्यातील दोन हजारावर शेतकरी, कामगार मोटारसायकलने यात्रेबरोबर सभेसाठी बुलडाण्याकडे रॅलीने जाणार आहेत. दरम्यान, बुलडाणा येथील सभा संपल्यावर संघर्ष यात्रा मुक्ताईनगरकडे प्रयाण करणार आहे.