एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव!
By Admin | Updated: May 24, 2017 01:07 IST2017-05-24T01:07:59+5:302017-05-24T01:07:59+5:30
पार्डी येथील ग्रामस्थ आक्रमक: अधिकाऱ्यांसमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव!
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : मेहकर तालुक्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईसाठी बळी गेलेल्या महिलेच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
१९ मे रोजी गावातील सावित्री सहदेव घुगे ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असता, विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, गटविकास अधिकारी पवार, उपअभियंता खिल्लारे गावामध्ये गेले. गावामध्ये ग्रामस्थांनी
अधिकाऱ्यांना घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलाविले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
माजी मंत्री सुबोध सावजी हे २२ मे रोजी पार्डी येथे होगे परिवाराच्या सांत्वनासाठी गेल्यानंतर त्यांना कोणताही अधिकारी साधी भेट देण्यासाठीसुद्धा पोहोचलेला नसल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी तेथूनच आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आदींना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करीत पाणीटंचाईची दाहकता कथन केली. त्यामुळे आयुक्तांनी दखल घेतल्याने जिल्हा प्रशासन खळबळून जागे होऊन उपविभागीय अधिकारी डॉ.अपार मंगळवारी पार्डी गावात पोहोचले होते. यावेळी गावकऱ्यांनी तप्त उन्हात डॉ. अपार यांना घेराव घालून उन्हातच उभे केले.
अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर गावात पोलीस आले व तीन तासानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सोडले.
पाण्यासाठी बायको मेली, आता मी फाशी घेतो!
पाण्यासाठी बायको मेली, आता असे तरसू तरसू मारु नका, ही दोरी घ्या आणि एकदाच फाशी देऊन मारुन टाका, नाही तर मी फाशी घेतो, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी सहदेव होगे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. सहदेव घुगे यांच्या पत्नीचा १९ मे रोजी पाण्यासाठी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. सहदेव घुगे यांच्या मागणीने सर्व जण अवाक झाले होते.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- सुबोध सावजी
महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला असला तरी ही परिस्थिती निर्माण होण्याकरिता अधिकारी जबाबदार आहेत. गावात अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई आतापर्यंत दूर करायला हवी होती; मात्र तसे न झाल्यामुळे महिलेच्या मृत्यूसाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.