शाळा सुरू, विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:55+5:302021-02-05T08:35:55+5:30
बुलडाणा : कोराेनामुळे मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुरुवातीला ९ वी ते १२ वी ...

शाळा सुरू, विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा
बुलडाणा : कोराेनामुळे मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुरुवातीला ९ वी ते १२ वी आणि त्यानंतर ५ ते ८ वीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यार्थिनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बससह इतर बसची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
जिल्ह्यातील चिखली, मेहकर, लाेणार, सिदंखेडराजा, देउळगावराजा, जळगाव जामाेद आणि संग्रामपूर तालुक्यांची निवड मानव विकास मिशनअंतर्गत करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये विद्यार्थिनींसाठी माेफत बससेवा सुरू करण्यात आली हाेती. जवळपास ४९ बस या तालुक्यांमध्ये धावत हाेत्या. काेराेनामुळे बससेवा बंद करण्यात आली हाेती. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू झाल्या असल्या तरी मानव विकास मिशनच्या बसची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
समिती निश्चित करते बस फेरीचा मार्ग
मानव विकास मिशनअंतर्गत निवड झालेल्या तालुक्यांमध्ये बसची संख्या तसेच मार्ग निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येते. यामध्ये आगारप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश असताे. ही समिती विद्यार्थिनींची संख्या पाहून मार्ग निश्चित करते.
काेराेनापूर्वी ४९ बस हाेत्या सुरू
काेराेना संक्रमण वाढण्यापूर्वी मार्च महिन्यात ४९ बस फेऱ्या सुरू हाेत्या. मुलींची संख्या किती त्यावर बसची संख्या निश्चित करण्यात आली आहे. जळगाव जामाेद, मेहकर तालुक्यांमध्ये सर्वाधिक मुलींची संख्या हाेती. त्यामुळे या तालुक्यांमध्ये बस माेठ्या प्रमाणात सुरू हाेत्या. मार्च महिन्यापूर्वी ४९ बस सुरू हाेत्या, शाळा सुरू झाल्यानंतर सध्या एकही बस सुरू नाही.
खासगी वाहनांचा आधार
ग्रामीण भागात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट सुरू आहे. मानव विकाससह इतर बसही सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातही बस फेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.
शाळा सुरू झाल्या असल्या तरी मानव विकास मिशनच्या बस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांनी शाळेत जावे लागत आहे. अनेक वेळा वाहने मिळत नसल्याने शाळेत जाता येत नाही.
साक्षी इंगळे, अंभाेडा
शाळा सुरू झाली असली तरी मानव विकास मिशनची बस अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे खासगी वाहनांनी शाळेत जावे लागत आहे. बससेवा सुरू करण्याची गरज आहे.
दीक्षा जाधव, काेलवड