बिबट्याची दहशत कायम!
By Admin | Updated: May 16, 2016 01:23 IST2016-05-16T01:23:25+5:302016-05-16T01:23:25+5:30
वडी शिवारात वनविभागाने लावले तीन पिंजरे.

बिबट्याची दहशत कायम!
नांदूरा : राष्ट्रीय महामार्गाला लागुनच असलेल्या वडी शिवारातील पाईप फॅक्टरीत मागील आठ दिवसांपासून पाईपमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तिन पिंजरे लावली असून दिवस रात्र कर्मचारी तैनातीत आहेत. मात्र वेळोवेळी पाईपांच्या मधून दिसणार्या बिबट्याला पकडण्यात अद्यापही वनविभागाला यश न आल्याने बिबट्याची दहशत वडी परिसरातील शेतकरी, मजुर व नागरीकांमध्ये कायम आहे. वडी शिवारातील पाईप फॅक्टरीतील मजुरांना ८ मे च्या संध्याकाळी पाईपवर बसलेला बिबट्या दिसला त्याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली होती. मात्र कर्मचारी आले व शोधाशोध करुन निघून गेले. त्यानंतर सतत बिबट्याचा मुक्त संचार फॅक्टरी परिसरात आहे. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने प्रकाशित केल्यानंतर ११ मे रोजी वनविभाग सतर्क झाला व त्यांनी आजरोजी तीन पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी पाईप फॅक्टरी परिसरात लावले आहेत. त्यापैकी एका पिंजर्यात बकरी तर दोन मध्ये प्रत्येक एक कोंबडी ठेवण्यात आली आहे. दिवसा तीन वन कर्मचार्यांचे पथक तर रात्री पाच कर्मचारी असलेले पथक परिसरात तैनात असते. १५ मे च्या दुपारी दोन कर्मचारी वनसेवक बज्जर व सपकाळ कार्यरत दिसून आले. तर या भागाचे वनपाल रघुवंशी हे मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा फोन बंद अवस्थेत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.कोंडावर हे संध्याकाळी पाईप फॅक्टरी परिसराला भेट देवून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. बिबट्या अद्यापही वनविभागाच्या पिंजर्यात अडकला नसला तरी त्याचा मुक्त संचार परिसरात कायम आहे.