पिण्याच्या पाण्यात नारूसदृश जंतू
By Admin | Updated: November 12, 2014 00:00 IST2014-11-12T00:00:38+5:302014-11-12T00:00:38+5:30
मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.

पिण्याच्या पाण्यात नारूसदृश जंतू
मेहकर (बुलडाणा): तालुक्यातील अंत्री देशमुख येथे पिण्याच्या पाण्यात नारूसदृश कृमी आढळून आला आहे. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. याला दूषित पिण्याचे पाणी व घाणीचे साम्राज्य कारणीभूत आहे. तालुक्यातील अंत्री देशमुख व परिसरातसुद्धा अज्ञात तापाची साथ सुरू आहे; परंतु येथील पिण्याच्या पाण्यात अद्यापपर्यंत ब्लिचिंग पावडर किंवा पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी अशा कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. अंत्री देशमुख गावाला लागून असलेल्या नदीकाठावरील विहिरीतून या गावात पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी अंत्री देशमुख येथे पिण्याच्या पाण्याची टाकीही बांधण्यात आली आहे. या टाकीत साठवलेले पाणी संपूर्ण गावाला पुरविले जाते. सदर पिण्याच्या पाण्यात नारूसदृश कृमी आढळून आल्याने अंत्री देशमुखवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे वाढत असलेले साथीचे आजार व गावाला मिळणार्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबरच अंत्री देशमुख येथे घाणीचे साम्राज्यही मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहे. गावात सर्वत्र घाण पसरली असताना ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन गावाला निर्जंंतुक पिण्याचे पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सोबतच यागोष्टीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तत्काळ संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंत्री देशमुख येथील ग्रामस्थांनी दिला.