संगम तलाव विकासकामे लवकरच सुरू!
By Admin | Updated: May 25, 2015 02:35 IST2015-05-25T02:35:48+5:302015-05-25T02:35:48+5:30
बुलडाणा शहरातील चार तलावांना आली अवकळा; विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी प्राप्त.

संगम तलाव विकासकामे लवकरच सुरू!
बुलडाणा : शहराचे वैभव असलेल्या संगम तलावाची कमालीची दुर्दशा झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण तलाव जलकुंभीने व्यापून टाकला आहे. तलावाच्या भिंतींवर मोठी झाडे उगवली, असून काठावर प्रचंड बेशरम वाढली आहे. या तलावाच्या दुर्दशेसंदर्भात अनेक वृत्तपत्रांनी वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत पालिकेला २५ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, २७ मेपासून कामे सुरू होणार आहेत. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजूला तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वष्रे शहराला संगम तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता, तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता; परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावांना अवकळा प्राप्त झाली. त्यापैकी तार तलाव व लेंडी तलाव केव्हाचेच नामशेष झाले आहेत, तर आता इंग्रज काळापासून पाणीपुरवठा करणार्या संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तलावात जलकुंभीची दाटी झाली असून, तलावाच्या भिंतींवर मोठमोठी झाडे उगवली आहे. तलावाच्या काठावर बेशरम फोफावली आहे. शहराचे वैभव असलेला संगम तलाव नष्ट होऊ नये, यासाठी अनेक स्तरातुन मागणी होत होती.