रेती वाहनाची धडक, ज्ञानगंगापूर येथे ७ वीज खांब कोसळले
By अनिल गवई | Updated: March 16, 2023 18:33 IST2023-03-16T18:33:09+5:302023-03-16T18:33:40+5:30
खामगाव आणि परिसरात अवैध रेती वाहतुकीचा जोर वाढला आहे.

रेती वाहनाची धडक, ज्ञानगंगापूर येथे ७ वीज खांब कोसळले
खामगाव : खामगाव आणि परिसरात अवैध रेती वाहतुकीचा जोर वाढला आहे. अज्ञात रेती वाहनाच्या धडकेत ज्ञानगंगापूर येथील सात वीज खांब कोसळले आहेत. ही घटना गुरुवारी पहाटे तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथे घडली.
एकाच वेळी सात वीज खांब कोसळल्यामुळे वीज तारा अस्ताव्यस्त झाल्या. परिणामी, काही जणांच्या घरांची तसेच आवार भिंतीची पडझड झाली. यामध्ये गावातील विलास पैठणकर यांच्या घराची आवार भिंत पडली. तसेच नंदकिशोर महाले, अनिल महाले, संतोष वानखेडे, विजय सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी यांच्या वीज मीटरची नासधूस झाली. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनधारकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनर्थ टळला
घटनेनंतर ज्ञानगंगापूर येथील वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वादळी वारा आणि पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचा सुरूवातीला गावकर्यांचा समज झाला. मात्र, सकाळी ही घटना उजेडात आली. त्यानंतर याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीसांत तक्रार नोंदविण्यात आली.