तेच गाव, तोच रस्ता अन् तेच शेत!
By Admin | Updated: November 22, 2015 02:17 IST2015-11-22T02:17:19+5:302015-11-22T02:17:19+5:30
सिंदखेडराजा तालुक्यात केंद्रीय पथकाचा दौरा, लोकप्रतिनिधी अनभिज्ञ.

तेच गाव, तोच रस्ता अन् तेच शेत!
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यात २0 नोव्हेंबरला केंद्रीय पथक आले. ते अचानक आले, हे बरोबर असले तरी त्यांचा दौरा निश्चित होता. हे जिल्ह्यातील महसूल विभागाला माहीत होते. गाव निवडताना कुठेतरी बदल हवा होता; परंतु मागील वर्षी जे गाव होते, तेच गाव, तोच रस्ता, तीच शेती निवडल्याने इतर शेतकर्यांमध्ये रोष निर्माण झाला. त्यातच या विभागाचे आमदार, जि.प.सदस्य, सभापती, पं.स.सदस्य यांना सुतराम माहिती नसल्याने दौर्याचे फलित काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात सावरगाव माळ हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर आहे. जालना मार्गे केंद्रीय पथक सरळ सावरगावमाळ येथे येऊन धडकले. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी कठोरे कुटुंबाची शेती दाखविण्याचा निर्णय रात्रीच तयार केला. शेती कोरडवाहू असल्याने त्यात नापिकी झाली होती. विशेष करून तालुक्यातील मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा या भागात शेतकर्यांनी दुबार पेरणी केली होती. या दोन जि.प.सर्कलमधील शेती केंद्रीय पथकाला दाखविली असती तर सोयाबीन बरोबर कपाशी, तूर, मूग, उडीद या पिकाची सविस्तर माहिती पथकाला मिळाली असती. केवळ एक वेळा नव्हे तर दोन वेळा शेती पेरणार्या शेतकर्यांचे काय हाल आहेत, याची माहितीही केंद्रीय पथकाला अवगत झाली असती. नापिकी हा विषय सतत तीन वर्षांपासून या तालुक्याला अनुभवायला मिळत आहे. पावसाची हुलकावणी, अवेळी पाऊस यामुळे शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतकर्यांनी शेती कशी करावी? हा प्रश्न निर्माण होत आहे. पथकाने पाहणी केली; परंतु ठोस निर्णय काय राहील, याची माहिती शेतकर्यांना दिली नाही.