स्नानगृहात सलाइनचा साठा; यंत्रही पडले धूळ खात!

By Admin | Updated: May 24, 2017 00:36 IST2017-05-24T00:36:51+5:302017-05-24T00:36:51+5:30

लोणार ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Saline storage in the bathroom; The machine fell into the dust! | स्नानगृहात सलाइनचा साठा; यंत्रही पडले धूळ खात!

स्नानगृहात सलाइनचा साठा; यंत्रही पडले धूळ खात!

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : हजारो रुग्णांचा जीव वाचविण्याची जबाबदारी असलेल्या लोणार ग्रामीण रुग्णालयात क्ष- किरण कक्षासह विविध कक्ष कुलूपबंद राहत असून, सलाइनच्या बाटल्या चक्क स्नानगृहात टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघडकीस आला आहे. यासोबतच रुग्णालयात असलेले कोट्यवधी रुपयांचे यंत्रही धूळ खात पडले आहेत.
लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात आजूबाजूच्या गावांमधील अनेक गोरगरीब रुग्ण दररोज येतात. मात्र, येथे डॉक्टर हजर नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. ग्रामीण रुग्णालयात क्ष- किरणसह लाखो रुपयांचे यंत्र आहेत; मात्र हे यंत्र धूळ खात पडले असून, या कक्षांना नेहमीच कुलूप असते, तसेच औषधांचा साठाही अडगळीत पडलेला असतो. रुग्णालयातील जैविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नाही, तर मंगळवारी रुग्णालयातील स्नानगृहात चक्क वापरलेल्या सलाइनच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत, खाटांची सोय असतानाही रुग्णांचे हाल होत आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. लोणार तालुक्यातील जवळपास १०० गावांतील नागरिक आरोग्यसेवा घेण्यासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात दररोज येतात; परंतु येथे वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त असल्यामुळे वैद्यकीय अधिकारीच रुग्णालयाचा कारभार पाहताना दिसतात. त्यातही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३ जागांपैकी २ जागा भरलेल्या होत्या. त्यापैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे येथे एकच महिला वैद्यकीय अधिकारी आहे. अधिपरिचारीकेच्या ७ जागापैकी ६ जागा भरलेल्या असून, २ अधिपरिचारिका बुलडाणा येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. एका अधिपरिचारिकेने मेडिकल रजा टाकली असून, एक प्रसूती रजेवर आहे. यामुळे येथे केवळ दोनच अधिपरिचारिका आहेत. सफाई कामगार व कक्षसेवक कायमस्वरूपीच सुटीवर राहत असल्यामुळे नेहमीच सफाईचा बोजवारा उडालेला दिसतो.

कर्मचाऱ्यांचंी दिरंगाई
रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर लोणार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून शव नातलगांना वेळेत देणे गरजेचे असते; पण कर्मचाऱ्यांअभावी तेथेही दिरंगाईच केली जाते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त असून, आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. रुग्णांवरही उपचार करण्यास दिरंगाई होत असल्याने कर्मचाऱ्यांची अशाप्रकारची दिरंगाई रुग्णांच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

खासगी प्रॅक्टिस सांभाळून केली जातेय शासकीय नोकरी
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना जिल्हा शल्यचिकित्सकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येते. खासगी प्रक्टिसमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेकडे लक्ष न देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई मात्र होताना दिसत नाही.

लवकरच उपाययोजना
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत १० मे रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता लोणार ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. या भेटीदरम्यान रुग्णालयाची पाहणी करीत रुग्णांची भेट घेऊन संवाद साधला. रुग्णालयातील समस्यांबाबत आढावा घेऊन अपुरे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी या विषयासंदर्भात लवकरच उपाययोजनेचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यानंतर रुग्णालयातील परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. परिस्थिती मात्र अधिकच बिकट झालेली आहे.

Web Title: Saline storage in the bathroom; The machine fell into the dust!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.