खामगावात भेसळयुक्त सिमेंटची दुसऱ्या कंपनीच्या नावावर विक्री
By अनिल गवई | Updated: September 2, 2023 13:22 IST2023-09-02T13:22:16+5:302023-09-02T13:22:48+5:30
९०० बॅग जप्त : सिमेंटची भेसळ करताना एकास छापा मारून पकडले

खामगावात भेसळयुक्त सिमेंटची दुसऱ्या कंपनीच्या नावावर विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बनावट आणि कमी दर्जाचे भेसळयुक्त सिमेंट दुसर्या दर्जेदार कंपनीच्या खाली बॅगमध्ये भरून विक्री करताना एकास शिवाजी नगर पोलीसांनी पकडले. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ताब्यातील आरोपीने दिलेल्या कबुलीवरून तीन वेगवेगळ्या गोदामात छापा मारून पोलीसांनी बनावट सिमेंटचे मोठे घबाडच उघडकीस आणले आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दर्जेदार कंपनीच्या खाली सिमेंटच्या पोतळीत बनावट आणि कमी दर्जाचे सिमेंट भरून विक्री केल्या जात असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीसांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलीसांनी मो. सुलतान मो. हारून २७ रा. निर्मल ऑईल मिल जवळ खामगाव याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शहरातील बर्डे प्लॉट भागातील एका आणि सजनपुरी बायपासवरील दोन अशा तीन वेगवेगळ्या गोदामात छापा मारला. त्यावेळी ९०० मिक्स सिमेंट बँग व सिमेंट, पाच हजार रिकाम्या पोतळ्या, सिलाई मशीन, सिमेंट गाळण्याची जाळी, फावडे, टोपले, असा एकुण अडीच लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी मुंबई येथील महेश अजूर्न मुखीया एका सिमेंट कंपनीच्या कर्मचार्याच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरूण परदेशी, बीबी पथकाचे पीएसआय विनोद खांबलकर यांनी ही कारवाई केली.
भेसळयुक्त सिमेंटचा बांधकामासाठी वापर
बांधकामाचा कंत्राट दिल्यानंतर करारानुसार कोणते सिमेंट वापरणार, साहित्य काय वापरणार असा करार केला जातो. त्यानुसार ठराविक कंत्राटदाराला रक्कम अदा केली जाते. मात्र, कंत्राटदाराकडून नफा वाढविण्यासाठी भेसळयुक्त सिमेंटचा वापर करण्यात येतो. त्यामुळे बांधकाम करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.