११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:06+5:302021-04-27T04:35:06+5:30
जिल्ह्यात गत काही महिन्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ ...

११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकले
जिल्ह्यात गत काही महिन्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्रावर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे़ वाढलेल्या ताणात आपला जीव धाेक्यात घालून सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे़ जानेवारी महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन रखडले हाेते़ १६ एप्रिल राेजी महाराष्ट्र राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने आंदाेलनाचा इशारा दिल्यानंतर एका महिन्याचे वेतन वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे़ तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे वेतनच मिळाले नसल्याचे चित्र आहे़ जिल्हा प्रशासन प्रशासनाच्या ढिसाळ नियाेजनामुळे काेराेना याेद्धा असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे़ काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना जानेवारी महिन्याचेही वेतन मिळाले नसल्याचे चित्र आहे़
नियुक्तीचे ननीन आदेशच नाहीत
जिल्हा परिषदेच्या वतीने विविध प्राथमिक आराेग्य केंद्रात बी.एम़ एस़ डाॅक्टरांची तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली हाेती़ जिल्ह्यातील ५६ तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा २८ फेब्रुवारी राेजी संपली आहे़ या अधिकाऱ्यांना नवीन आदेश मिळतील अशी, आशा असल्याने त्यांनी आपली सेवा सुरू ठेवली़ मात्र, एप्रिल महिन्यापर्यंत अनेकांना पुनर्नियुक्तीचे आदेशच मिळाले नसल्याचे चित्र आहे़ एकीकडे आराेग्य विभागावर ताण पडल्याने डाॅक्टर आणि परिचारिकांची संख्या कमी पडत आहे़ दुसरीकडे बीएमएस डाॅक्टरांना नियुक्तिपत्र मिळाले नसल्याचे चित्र आहे़
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले हाेते़ संघटनेने वारंवार पाठपुरावा केल्याने जानेवारी महिन्याचे वेतन मिळाले आहे़ तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन रखडलेले आहे़ संघटनेने आंदाेलनाचा इशारा दिल्यानंतर एक महिन्याचे वेतन देण्यात आले़ तसेच तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे़
डाॅ़ नीलेश टापरे, अध्यक्ष
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना बुलडाणा जिल्हा
प्राथमिक आराेग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन येत्या दाेन दिवसात जमा करण्यात येणार आहे़ तसेच ज्या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती राहिल्या आहेत, त्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़
डाॅ़ सांगळे, प्रभारी जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा