‘प्रतापगड’वर भगवा कायम
By Admin | Updated: October 20, 2014 00:10 IST2014-10-20T00:10:13+5:302014-10-20T00:10:13+5:30
मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पकड कायम, रायमुलकर विजयी.

‘प्रतापगड’वर भगवा कायम
ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)
मेहकर विधानसभा मतदारसंघ गत २0 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. प्रतापगड म्हणून ओळख असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात यावेळीही शिवसेनेचे उमेदवार डॉ. संजय रायमूलकर यांनी ३५ हजार ९३५ मताधिक्य घेऊन भगवा कायम ठेवला.
मेहकर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी लढत रंगत आली आहे. परंतु, यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तुटल्याने आणि शिवसेना व भाजप यांनीही काडीमोड घेतल्याने मेहकर विधानसभेचे चित्र पालटले होते. सुरुवातीला बदलती राजकीय समीकरणांवरून ही प्रता पगडावरचा भगवा टिकवून ठेवण्यात कितपत यशस्वी होते, असाच काहीसा सूर होता. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रतापगडाला सुरूंग लावण्याची बर्यापैकी फिल्डींग लावली होती. मात्र, शिवसेनेचे डॉ. संजय रायमूलकर यांनी तब्बल ३५ हजार ९३५ मताधिक्य घेऊन प्रतापगडाची प्रतिष्ठा कायम ठेवली.
मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉ. संजय रायमूलकर यांनी ८0 हजार ३५६ मते घेऊन शिवसेनेची विजयाची परंपरा राखली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव घुमरे यांना मेहकर मतदारसंघात केवळ ४४ हजार ४२१ मतांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर भाजपचे नरहरी गवई यांना केवळ १७ हजार ३५ मतांवर पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीच्या अश्विनी आखाडे यांच्या झोळीतही केवळ १२ हजार ७५९ मते पडली.