लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रूईखेड मायंबा येथे एका चर्मकार समाजाच्या महिलेची नग्न धिंड काढण्याच्या प्रकरणाने आता पेट घेतला असून, विविध चर्मकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. शुक्रवारी बुलडाणा येथे विविध संघटनांनी धरणे दिली आणि जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रूईखेड मायंबा येथील पीडित महिलेला व तिच्या दोन मुलांना गावातील काही लोकांनी मारहाण केली, तसेच पीडितेची नग्न धिंडही काढली. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध तक्रार देऊन गुन्हेही दाखल करण्यात आले. रविवार ४ जून रोजी घडलेल्या या प्रकरणाचे आता सर्वत्र पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी चर्मकार समाजाच्या विविध संघटंनांच्या पदाधिकार्यांनी रूईखेड मायंबा येथे पीडित महिलेच्या कुटूंबीयांची भेट घेतली. त्यानंतर गुरू रविदास समता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले, तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन देत, पीडितेवर दाखल गुन्हे मागे घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी धारावीचे माजी आमदार बाबूराव माने, शारदा नवले, लक्ष्मणराव घुमरे, राम कदम, देगलूकर यांच्यासह राज्यभरातील पदाधिकार्यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने बुलडाणा येथे बैठक घेऊन चर्मकार समाजावर होणार्या अन्यायाविरूद्ध पेटून उठत सर्वांनी एक होऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डी.आर.माळी यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणी काँग्रेसचे अनूसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र दळवी यांनीही जिल्हाधिकार्यांकडे या प्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडितांच्या कुटुंबियाची जिल्हाधिकार्यांनी घेतली भेट शुक्रवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्यासह तहसीलदार सुरेश बगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी, ठाणेदार संग्राम पाटील यांनी रुईखेड मायंबा गावास भेट दिली. त्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पीडितांच्या नातलगांनी आपबिती कथन करत, आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकार्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रशासनाचे वतीने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या व तसेच पीडितेच्या कुटुंबीयास संरक्षण देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
रूईखेड मायंबाप्रकरणी चर्मकार संघटना आक्रमक
By admin | Updated: June 10, 2017 02:03 IST