रूईखेड मायंब्यात मारहाण झालेल्या महिलेला सहा लाखांची मदत
By Admin | Updated: June 10, 2017 13:11 IST2017-06-10T13:11:02+5:302017-06-10T13:11:02+5:30
शनिवारी सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची भेट घेतली. तसंच एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी केली आहे.

रूईखेड मायंब्यात मारहाण झालेल्या महिलेला सहा लाखांची मदत
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 10 - रूईखेड मायंबा येथे एका महिलेला तीच्याच गावातील काही नागरिकांनी मारहाण केली होती तसंच त्या महिलेची धिंडसुद्धा काढली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर सध्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची भेट घेतली. तसंच एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी केली आहे.
रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करून धिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलन करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी महिलेनी तिला झालेल्या मारहाणीची माहिती दिली. गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं महिलेने बडोले यांना सांगितलं आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कडक कारवाई करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या आहेत.
"ही घटना दुर्देवी असून अशाप्रकारच्या घटना घडणं पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. जिल्हा प्रशासनाने अशा घटनांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच समाजानेही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले म्हणाले आहेत.
यावेळी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थुल, जि. प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडपुते, प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत,अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे उपस्थित होते.