करपलेल्या पिकांवर फिरवला वखर
By Admin | Updated: July 13, 2015 01:10 IST2015-07-13T01:10:38+5:302015-07-13T01:10:38+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील परिस्थिती; पावसाअभावी उभी पिके करपली; शेतकरी हवालदिल.

करपलेल्या पिकांवर फिरवला वखर
अशोक इंगळे/सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यात जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यावर शेतकर्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली; परंतु २८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप पिके करपली आहेत. या करपलेल्या पिकांची तालुक्यातील अनेक शेतकरी वखराने मोडणी करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांवर आता यावर्षी पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ७0 टक्के लोकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. २0१२-१३ ला गारपिटीने गहू, हरभरा, मका ही पिके गेली. मागील वर्षी सोयाबीन पिकाने दगा दिला. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके करपली आहेत. पिकात उगवणक्षमता नसल्याने शेतकर्यांवर शेतात वखर फिरविण्याची पाळी आली आहे. यावर्षी ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता. यावर्षी वरुणराजाची कृपा होईल या आशेने शेतकर्यांनी पेरणीलाही सुरुवात करून दिली होती. मृग नक्षत्रात सिंदखेडराजा सोनुशी, दुसरबीड, किनगावराजा मंडळात समाधानकारक पाऊस पडला. ७ ते २0 जून या तेरा दिवसात तालुक्यात पावसाने बर्यापैकी हजेरी लावली. त्यावर शेतकर्यांनी पेरणीला सुरुवातही केली. २५ जूनपर्यंंंत ८0 टक्के शेतकर्यांनी सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मूग, उडीद या खरीप पिकाची पेरणी केली. ज्यांची पेरणी १८ जूनपर्यंंंत झाली. त्या शेतकर्यांची पेरणी साधली; परंतु १८ जूननंतर पेरणी केलेल्या पिकाला दमदार पाऊस न मिळाल्याने त्या पिकांची वाढ होऊ शकली नाही. पिके करपू लगली आहेत. पेरणी झाल्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकं जगविण्यासाठी शेतकरी स्प्रिंक्लर, ठिबक सिंचन यांचा वापर करीत आहेत.