पंधरा दिवसात रस्त्याची दुरूस्ती!
By Admin | Updated: January 5, 2016 02:07 IST2016-01-05T02:07:42+5:302016-01-05T02:07:42+5:30
मुख्यमंत्र्यांची ग्वाही ; व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद.

पंधरा दिवसात रस्त्याची दुरूस्ती!
बुलडाणा : बुलडाणा ते औरंगाबाद हे १३८ कि.मी. एवढे अंतर आहे. बुलडाणा येथून औरंगाबाद जाणार्या सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत ४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तक्रारकर्ते गजानन कुळकर्णी यांच्या समवेत संवाद साधला. यावेळी सदर रस्त्याची पंधरा दिवसात दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. बुलडाणा धाड मार्गे औरंगाबाद या रस्त्याची दुरवस्था दूर व्हावी म्हणून अनेक स्तरावर तक्रारी केल्यावरही त्याची दखल घेतल्या जात नसल्याने गजानन कुळकर्णी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केली. या तक्रारीची मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत ४ जानेवारी रोजी कुळकर्णी यांच्यासमवेत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत प्रधान सचिव तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी होते. कुळकर्णी यांनी सदर रस्त्याच्या दुरवस्थेचे फोटोच यावेळी दाखविले, तसेच हा रस्ता ७५ टक्के औरंगाबाद विभागात येत असूनही या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्या विभागाचे एकही अधिकारी उपस्थित नाहीत, ही बाब नमूद केली असता, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सचिवांना सूचना देत मराठवाडा विभागालाही कामासंदर्भात निर्देश दिले, तसेच रस्त्याचे काम पंधरा दिवसात होईल, असे सांगितले.