राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली गोदावरीच्या ऑनलाईन शिक्षणाची गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST2021-09-05T04:38:56+5:302021-09-05T04:38:56+5:30
बुलडाणा : कोरोना काळात शाळा बंद झाल्याने शिक्षण विभागात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंच्या तालुक्यातील एका महिला ...

राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली गोदावरीच्या ऑनलाईन शिक्षणाची गंगा
बुलडाणा : कोरोना काळात शाळा बंद झाल्याने शिक्षण विभागात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंच्या तालुक्यातील एका महिला शिक्षिकेने तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड देत शिक्षणाचे हजार व्हिडीओ व ऑनलाईन टेस्ट बनविल्या. कोरोना काळात शिक्षिका गोदावरीच्या या ऑनलाईन शिक्षणाची गंगा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून, त्याचा पाच कोटी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम हा शिक्षण विभागावर झालेला आहे. शाळा बंद झाल्या तरी शिक्षण सुरूच आहे. त्यासाठी शिक्षकांना ऑनलाईनचा आधार घ्यावा लागला. परंतु ऑनलाईनमध्येही अनेक मुलांना अडचणी आहेत. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कसे सोईचे होईल, यासाठी शिक्षकांनी नवनवीन प्रयोगही गत दीड वर्षाच्या कार्यकाळात राबविले आहेत. काही शिक्षक ऑनलाईन शिक्षणाच्या नवनवीन संकल्पना राबवित आहेत. त्यातीलच एक महिला शिक्षिका गोदावरी जगन्नाथ तांबेकर (झोरे) ह्या आहेत. त्या सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांचे ऑनलाईन शिक्षणाचे व्हिडीओ आज राज्यभर गाजत आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे व्हिडीओ बघितल्यानंतर मुलांना त्यामध्ये काय अडचणी येतात, याचा त्यांनी अभ्यास करून विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या भाषेत व्हिडीओ बनविले आहेत. डिजिटल अभ्यासासाठी त्यांनी यापूर्वीच व्हिडीओ बनवायला सुरुवात केली होती. परंतु कोरोना काळात ऑनलाईन अभ्यासासाठी मदत व्हावी, यासाठी त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासाचे व्हिडीओ तयार केले आहेत. आजपर्यंत एक हजार व्हिडीओ तयार करून ते यूट्यूबवर गोदावरी तांबेकर नावाने अपलोड केले आहेत. या व्हिडीओंचा काेरोना काळात विद्यार्थ्यांना चांगला उपयोग झाला आहे.
शिक्षकांना अध्यापनात झाला उपयोग
शिक्षिका गोदावरी तांबेकर यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व गणित या विषयांवर तयार केलेल्या व्हिडीओचा अनेक शिक्षकांना अध्यापनासाठी चांगला उपयोग झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ७२ लाख शिक्षक व विद्यार्थ्यांनी अध्यापनात या व्हिडीओचा वापर केलेला आहे.
ऑनलाईन टेस्ट सोडविणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात
शिक्षिक गोदावरी तांबेकर यांनी व्हिडीओसोबतच ऑनलाईन टेस्टही तयार केल्या आहेत. आजपर्यंत एकूण पाच कोटी विद्यार्थ्यांनी ह्या ऑनलाईन टेस्ट सोडविल्या आहेत. पहिली ती दहावीपर्यंतच्या अभ्यासावर सर्व चाचण्या आहेत. तसेच शिष्यवृत्ती, नवोदय स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन चाचण्या त्यांनी तयार केल्या आहेत.
एकूण व्हिडीओ: १०००
व्हिडीओ बघणाऱ्यांची संख्या : ३७२०००००
ऑनलाईन टेस्ट: १६००
टेस्ट सोडविणारे विद्यार्थी : ५०००००००
कोरोना काळात मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी, पहिली ते दहावीपर्यंतच्या ऑनलाई टेस्ट आणि व्हिडीओ मी तयार केले. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होत असून, अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया दररोज येत आहेत.
गोदावरी तांबेकर, शिक्षिका.