रोजगार हमी योजनेतील रोपांचे होणार ऑडिट
By Admin | Updated: September 10, 2014 02:12 IST2014-09-10T02:12:46+5:302014-09-10T02:12:46+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या ३६ कामांची १७ दिवसांततपासणी होणार

रोजगार हमी योजनेतील रोपांचे होणार ऑडिट
बुलडाणा : रोजगार हमी योजनेतून तीन वर्षांत लावण्यात आलेल्या रोपांची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यातून बुलडाणा जिल्ह्यासाठी २१ दिवसात १३९ काम तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; मात्र स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाकडून मात्र १७ दिवसात केवळ ३६ कामांची तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित सात दिवसात १0३ कामांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट सामाजिक वनीकरण विभागापुढे आहे.
रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर किती रोपे जगली, किती रोपे मृत झाली, नवीन रोपे लावता येणे शक्य आहे काय, याची तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या २१ दिवसाच्या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात रोजगार हमी योजनेतून रोप लागवडीची ४१८ कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली. यात २0११-१२ या वर्षात १६५, २0१२-१३ मध्ये ४६ आणि २0१३-१४ मध्ये २0७ काम करण्यात आली. यापैकी २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान १३९ कामांची तपासणी सामाजिक वनीकरण विभागाकडून करायची आहे; मात्र ८ सप्टेंबरपर्यंत केवळ ३६ कामांची तपासणीच पूर्ण झाली आहे. या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी तपासणी पथकास अडचणी येत आहेत. येणार्या काही दिवसात तपासणी कामास वेग येणार असल्यामुळे वेळेत लेखा परीक्षण पूर्ण होणार आहे.