अनियमित वीज पुरवठय़ामुळे पिके धोक्यात
By Admin | Updated: December 8, 2014 01:40 IST2014-12-08T01:25:33+5:302014-12-08T01:40:40+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील प्रकार; वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतक-यांची मागणी.

अनियमित वीज पुरवठय़ामुळे पिके धोक्यात
सिंदखेडराजा (बुलडाणा): तालुक्यातील दुसरबीड उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या ताडशिवणी आणि जांभोरा परिसरातील कृषिपंपांना मिळणारा वीज पुरवठा अनियमीत झाल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
जांभोरा-ताडशिवणी या परिसरातील शेतकर्यांना दुसरबीड सबस्टेशनवरुन कृषी पंपासाठी वीज पुरवठा केल्या जातो. हा वीज पुरवठा २४ तासातून फक्त ६ तास होत असल्याने आणि तोही नियमीत नसल्याने गहू, हरभरा, कपाशी, तुर, ऊस या पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे. सहा तासाच्या काळामध्येच परमिट घेवून दुरुस्तीच्या नावाखाली दोन ते तीन तास नेहमीच वीज पुरवठा खंडीत केल्या जातो. याच भागातून खडकपूर्णा नदी जात असल्याने नदी पात्रात कोल्हापुरी बंधारा आहे. या पात्रातून २00 वीज ग्राहक कृषी पंपधारक आहेत. खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामातील पिक घेवून आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न या भागातील शेतकरी करीत आहेत. परंतु वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे रब्बी पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. दुसरबीडचे कनिष्ठ अभियंता नागरे यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी देऊनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. सहा तासाऐवजी १२ तास वीज पुरवठा सुरळीत देण्यात यावा, तसेच कोण तेही परमिट न घेता भारनिामन करु नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.