पिकं बुडल्यात जमा!
By Admin | Updated: September 25, 2014 01:18 IST2014-09-25T00:52:51+5:302014-09-25T01:18:11+5:30
पश्चिम विदर्भातील कापूस व सोयाबीन पीकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी अडचणीत.

पिकं बुडल्यात जमा!
खामगाव (बुलडाणा) : यावर्षी सुरुवातीपासून बळीराजावर अस्मानी संकट दिसून येत आहे. शेतमाल घरात येण्याच्या वेळेसच कपाशी व सोयाबीनवर रोगाचा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पश्चिम विदर्भातील सुमारे ४ लाख हेक्टरवरील सोयाबीन तसेच कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.
यावर्षी जून तसेच जुलै महिनाभर पावसाची अवकृपा झाली. विदर्भासोबतच राज्यात सर्वत्र पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे कोरडवाहूच्या पेरण्या रखडल्या होत्या. तर बागायती शेतीतील विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकर्यांना मोठय़ा हिमतीवर, मेहनतीवर कपाशी पीक जगवावे लागले; मात्र त्यानंतर पाऊस येवून पिके बहरात असतानाच आता शेतमाल घरात येण्याच्या वेळेतच कपाशीवर मर रोगाचा तर सोयाबीन पिकावर खोड किड्यांचा व कापटोफ्थेरा बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच कोरडवाहू शेतातील सोयाबीन पीक फुले येण्याच्या अवस्थेतच पावसाअभावी सुकत आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकर्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आंतरमशागत न करता आल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती निर्माण झाली नाही; तसेच रस शोषणार्या तुडतुडे व फुलकिड्यांच्या तीव्र प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाची पाने कडेने लाल झाली आहेत. त्वरित आंतरमशागत म्हणजे वखरणी करणे, एकरी २५ किलो युरियाची मात्रा त्वरित जमिनीतून देणे तसेच रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी अँसिफेट+ अँडमायर हे मिश्र कीटकनाशक ६0 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची त्वरित फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. तर सोयाबीनवर खोड किड्यांचा व कापटोफ्थेरा बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने शेतकरी पुरता खचला आहे.