तांदूळ प्रकरणातील आरोपी फरार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:09 IST2017-08-23T00:06:29+5:302017-08-23T00:09:19+5:30
खामगाव: येथे उघडकीस आलेल्या २0 टन तांदूळ घोटाळ्यातील आरोपी तथा नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी फरार असून, पोलिसांना याप्रकरणी आणखी सुगावे लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाच्या अधिकारी तपासासाठी खामगाव शहर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार खामगाव आणि तहसीलदार नांदुरा यांना पत्र दिले आहे.

तांदूळ प्रकरणातील आरोपी फरार!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथे उघडकीस आलेल्या २0 टन तांदूळ घोटाळ्यातील आरोपी तथा नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी फरार असून, पोलिसांना याप्रकरणी आणखी सुगावे लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाच्या अधिकारी तपासासाठी खामगाव शहर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार खामगाव आणि तहसीलदार नांदुरा यांना पत्र दिले आहे.
रविवारी सकाळी खामगाव येथील बाळापूर नाक्यावर पकडण्यात आलेल्या ट्रकमधील तांदळाच्या बारदाण्यावर भारतीय खाद्य निगम, मध्यप्रदेश खाद्य निगम, हरियाणा खाद्य निगम असे आढळून आले आहे. त्यामुळे रेशनच्या तांदळाचा काळाबाजार होत असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नांदुरा येथील ओम राठी फरार असून, पुरवठा कंत्राटदार सतीश गुप्ता यांनी केलेल्या कंत्राटाचेही दस्तऐवज पोलिसांनी मिळविले असून, या प्रकरणाच्या तपासाला गती दिली जात आहे. तथापि, ओम राठी यांनी कोणत्या दुकानातून हा तांदूळ गोळा केला, त्या सर्व रेशन दुकानदारांचीही चाचपणी केली जाणार आहे.
रेशनच्या मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट विदर्भात कार्यरत असल्याच्या अंदाजावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खामगाव येथे २0 टन तांदूळ पकडण्यात आल्यानंतर या प्रकरणातील आरोपींची पाळंमुळं शोधून काढण्यात येत आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्यांना पत्र दिले आहे.
- यु.के.जाधव, ठाणेदार खामगाव