लोणार तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:08+5:302021-04-24T04:35:08+5:30
सध्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोणार येथील एकमेव कोविड सेंटरसुद्धा अपुरे पडते की काय, अशी ...

लोणार तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा
सध्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोणार येथील एकमेव कोविड सेंटरसुद्धा अपुरे पडते की काय, अशी परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर आ.डॉ. संजय रायमूलकर यांनी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये लोणार तालुक्यात येत्या काही दिवसात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याविषयी माहिती घेतली. तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड यांनी विशद केली. कोविड केअर सेंटरवरील एकूण व्यवस्थेबाबतची माहिती कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी यांच्याकडून जाणून घेतली. तालुक्यातील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भरीव मदत साधनसामग्रीच्या स्वरूपात करणार असून, रुग्णांना उच्च दर्जाच्या सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. रायमूलकर यांनी स्पष्ट केले. तालुक्यात कोविड सेंटरसाठी रुग्णवाहिका, ऑक्सिजन, अद्यावत बेड सुविधा यासह इतर अत्यावश्यक औषधी तसेच येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य विमा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नगर परिषदेसाठी शववाहिका, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्ट्रेचर, ऑक्सिजन इत्यादी साहित्य प्राधान्याने पुरविले जाईल, असेही सांगितले. या बैठकीसाठी तहसीलदार सैपन नदाफ, ठाणेदार रवींद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड, जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक प्रा. बळीराम मापारी, बीडीओ तांबे, नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शहा, कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश सानप, डॉ. प्रल्हाद जायभाये, डॉ. माल, डॉ. यमगीर, डॉ. अग्रवाल, शहराध्यक्ष पांडुरंग सरकटे, गटशिक्षण अधिकारी पी. एम. मापारी यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.