संग्रामपूर, जळगावमध्ये विंधन विहिरींवर निर्बंध
By Admin | Updated: April 7, 2015 01:57 IST2015-04-07T01:57:40+5:302015-04-07T01:57:40+5:30
भूजल प्राधिकरणाचा निर्णय; जमिनीची होत आहे चाळणी.

संग्रामपूर, जळगावमध्ये विंधन विहिरींवर निर्बंध
बुलडाणा : जिल्ह्यात भूजलाचा वापर हाच महत्त्वाचा स्त्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी जमिनीच्या पोटाची अक्षरक्ष: चाळणी करून कूपनलिका व विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. या कूपनलिका किती खोल घेतल्या जाव्यात, यासाठी भूजल अधिनियम असला तरी तो कागदावरच राहतो त्यामुळे अनेक परिसरात अतिउपसा झाला असल्याने राज्याच्या भूजल प्राधिकरणाने खोल कूपनलिका घेण्यावर बंधने आणली आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे कू पनलिका घेण्यास प्रतिबंध घातला असून, त्यामध्ये बुलडाण्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यतील १३२ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य भूजल प्राधिकरणाने राज्यातील अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विंधन विहीर व कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध घातला आहे. या क्षेत्रात अशा विंधन विहिरी किंवा कूपनलिका खोदल्या, तर भूजल भरण व उपसा यांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अपवादात्मक स्थि तीत मात्र परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या खारपाण पट्टय़ातील दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खारपाणपट्टय़ात जमीन चोपणची असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आधीच कमी आहे. येथे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांनी ४00 फुटांपेक्षाही जास्त विंधन विहिरी घेतल्या आहेत. त्यामुळे जमिनीतील उपसा मोठय़ा प्रमाणात वाढला असून, तो थांबला नाही. पुनर्भरण व उपसा यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण झाले आहे. या १३२ गावांपैकी ६0 टक्के गावे हे तर अतिशोषित स्वरूपात मोडत असल्याने भूजल अधिनियमनाची अंमलबजावणी गांभीर्याने घेणे गरजचे आहे.