खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील डोक्यावरचे केस गळती झालेल्या रुग्णांचा डाॅ. हिम्मतराव बावस्कर यांचा शोध आणि ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जीव भांड्यात पडला आहे. आजाराबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) चमूसह आयुष मंत्रालय, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद तज्ज्ञांनी घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच विंचूदंशावर प्रभावी लस शोधणाऱ्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी नमुन्याचा शोध घेत त्यातील सेलेनियम व झिंकाच्या प्रमाणामुळे हा प्रकार झाल्याचे पुढे आणले. ‘लोकमत’ने त्याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने या परिसरातील रुग्णांसह समाजातील प्रतिष्ठितांनी त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत प्रशंसाही केली आहे.
आजाराचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारपासून अनेक एजन्सीज त्या गावांत गेल्या. त्यांनी घेतलेल्या नमुन्यांचा अंतिम निरीक्षणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्याचवेळी विंचूदंशावर औषध शोधणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः त्यांच्या टीमसह या भागाला भेट दिली.
स्वखर्चाने या भागातील पाणी, धान्य, लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यातून आलेले निष्कर्ष त्यांनी मांडले. त्याचे वृत्त लोकमतने मुख्य पानावर गुरुवारी प्रसिद्ध केले. त्याची सर्वत्र चर्चा झाली. तसेच वस्तुस्थिती पुढे आल्याने आता उपाययोजना करता येतील, अशी आशा बाधित गावांतील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
नांदुरासह शेगाव तालुक्यातील या आजाराबाबत डॉ. बावस्कर यांनी केलेले कार्य चांगलेच आहे. त्यांच्या कामामुळे रुग्णांसह शासकीय यंत्रणेला मदत होणार आहे. सोबतच ‘लोकमत’ने समाजाच्या आरोग्याची असलेली जाणीवही या माध्यमातून मांडल्याने त्यांचे कामही कौतुकास्पद आहे.-चैनसुख संचेती, आमदार, मलकापूर