विहीरीत पडलेल्या बिबट्ट्याच्या बछड्याची सुटका; करवंड शिवारातील घटना
By निलेश जोशी | Updated: February 14, 2024 18:56 IST2024-02-14T18:56:20+5:302024-02-14T18:56:50+5:30
पहाटेपर्यंत सुरु होते रेस्क्यू ऑपरेशन

विहीरीत पडलेल्या बिबट्ट्याच्या बछड्याची सुटका; करवंड शिवारातील घटना
बुलढाणा: शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला तब्बल ११ तासांच्या महतप्रयासानंतर वाचविण्यास वनविभागाच्या पथकाला यश आले. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी चारवाजेच्या सुमारास हा बिबट्याचा बछडा विहीरीत पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने हालचाली करून पहाटे तीन वाजेदरम्यान या बछड्याला विहीरीतून सुरक्षीत बाहेर काढले.
बुलढाणा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या करवंड शिवारात गोविंद चव्हाण यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्याच्या बछडा पडल्याचे त्यांचे निदर्शनास आले होते. त्यांनी त्याची माहिती तत्काळ बुलढाणा वन विभागाला दिली. त्यानुषंगाने आरएफओ अभिजीत ठाकरे रेस्क्यू टीमचे वनपाल रामेश्वर वायाळ, प्रफुल मोरे, मोहसिन खान, वनरक्षक रानी जोगदंड पाटील, संदीप मडावी, परमेश्वर सावळे, दीपक घोरपडे, दीपक गायकवाड, अमोल चव्हाण, ऋषी हिवाळे, प्रवीण सोनुने हे सर्वजण बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
बछड्याने घेतला होता कपारीत आश्रय
विहीरीत पडलेल्या बछड्याने एका कपारीत आश्रय घेतला होता. त्यामुळे तेथून त्याला बाहेर काढणे हे वनविभागाच्या बचाव पथकासाठी जिकरीचे होऊन बसले होते. त्यामुळे प्रारंभीचे काही प्रयत्न निरर्थकही झाले होते. मात्र शेवटी १४ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास या बछड्याला विहीरीतून सुखरूप बाहेर काढण्यात येऊन बुलढाणा येथील विभागीय वन कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वनविभागाचे एक पथक या बछड्याला घेऊन नागपूरला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे रवाना झाल्याची माहिती आहे.