किडनीग्रस्त रूग्णांना दिलासा
By Admin | Updated: August 5, 2014 22:25 IST2014-08-05T22:25:40+5:302014-08-05T22:25:40+5:30
डायलेसीस सुविधा व शिबिरांमुळे सुविधा

किडनीग्रस्त रूग्णांना दिलासा
जळगाव जामोद : खारपाणपट्याच्या पृष्ठभुमीवर जिल्ह्यातील घाटाखालील भागात किडनीग्रस्त रूग्णांची संख्या गत काही वर्षात सारखी वाढत असताना याला पायबंद बसावा म्हणून आ.डॉ.संजय कुटे यांनी विशेष बाब या सदराखाली आरोग्य विभागाकडून शेगाव येथे उपजिल्हा रूग्णालयात डायलेसीस सेंटरची सुविधा निर्माण करून दिली. तसेच सलग तीन वर्ष किडनी रूग्णांसाठी शिबिरे घेवून त्यांचे मोफत उपचार करवून घेतले. त्यामुळे किडनीग्रस्त रूग्णांना मोठा दिलासा मिळाला.
जळगाव, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात सुमारे चार हजार किडनी आजाराने ग्रस्त रूग्ण आढळून येतात. गत पाच-सहा वर्षात अंदाजे तीनशे व्यक्तींना किडनी आजाराने आपले प्राण गमवावे लागल्याची शक्यता आहे. परिणामी सामान्य जनतेत भितीचे मोठे वातावरण निर्माण झाले होते. किडनीच्या आजारावरील उपचार सुध्दा महागडे त्यामुळे सामान्य परिस्थितीतील व्यक्तींला मृत्यूला कवटाळण्याशिवाय पर्याय नसायचा. ही गंभीर बाब पेशाने डॉक्टर असलेल्या आ.संजय कुटे यांच्या मनाला अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी सन २00९ पासून या विषयाचा शासन दरबारी व जिल्हा नियोजन बैठकीत सतत पाठपुरावा करून किडनीग्रस्त व मुतखडा रूग्णांसाठी शासकीय निधीतून मोफत शिबिराची औषधोपचारासह तरतूद करून घेतली. या माध्यमातून जळगाव, संग्रामपूर व शेगाव येथे सन २0१२ मध्ये पहिल्या तीन शिबिराचे आयोजन केले होते. याला रूग्णांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.
सोबतच मोफत उपचार व औषधे प्राप्त झाल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळाला, अशी शिबिरे २0१३ व १४ मध्ये सुध्दा पार पडली. जे रूग्ण जास्त गंभीर होते अशा सुमारे शंभर रूग्णांना मुंबई येथील केईएम व जेजे हॉस्पीटलमध्ये नेण्याची व्यवस्थाही आ.डॉ. कुटे यांनी गत सात वर्षात केल्याचे दिसून येते.