‘लाल दिव्या’चे पहिले मानधन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला
By Admin | Updated: September 9, 2015 01:53 IST2015-09-09T01:53:10+5:302015-09-09T01:53:10+5:30
वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांचे पाऊल; शेतक-यांना दिलासा.

‘लाल दिव्या’चे पहिले मानधन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला
बुलडाणा : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा दु:खी, कष्टी आहे. भयंकर संकटामुळे खचून गेलेले शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. शेतकर्यांनी स्वत:ला सावरून आपल्या लेकरांना उघड्यावर टाकून आत्महत्या करू नये, याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांना मिळालेले पहिले मानधनही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सर्मपित केले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर १६ मे २0१५ रोजी मुंबईवरून येत असताना चिखला येथे कर्जबाजारी झालेल्या मोहन त्र्यंबक वाघ या शेतकर्याने आत्महत्या केल्याची माहिती तुपकरांना समजली. त्याचवेळी त्यांनी वाघ कुटुंबाचे सांत्वन करून आपल्याला मिळणारे पहिले मानधन वाघ कुटुंबियांना देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पहिले मानधन मृत शेतकर्याची पत्नी राधाबाई वाघ यांच्या पदरात टाकून तुपकर यांनी पूर्ण केला. तसेच सारोळापीर येथे मधुकर रामधन बावस्कर व दुधा येथील उत्तम सोनुने या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनायक वाघ, युवा जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत, विद्यार्थी संघटनेचे चंद्रशेखर चंदन, ज्येष्ठ नेते सतीश उबाळे, कडुबा मोरे, दिलीप निकम उपस्थित होते. ना. तुपकर यांनी चिखला, दुधा, घाटनांद्रा, माळवंडी, केसापूर, भादोला व वाडी येथे दुष्काळी भागात शेतकरी व गावकर्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, अशी विनंती ना.तुपकर यांनी यावेळी केली.