वसुली ५७ लाखांची; खर्च १९ हजार!
By Admin | Updated: January 4, 2016 02:34 IST2016-01-04T02:34:11+5:302016-01-04T02:34:11+5:30
वृक्ष लागवडीचे पैसे इतरत्र खर्च; बुलडणा नगर पालिकेतील प्रकार माहितीच्या अधिकारातून निष्पन्न.

वसुली ५७ लाखांची; खर्च १९ हजार!
सिद्धार्थ आराख / बुलडाणा: नगरपालिकेने २00५ ते २0१५ या दहा वर्षांंमध्ये नागरिकांकडून वृक्ष कराच्या माध्यमातून ५७ लाख ७७ हजार ३३३ रुपये वसूल केले, तर वृक्ष लागवड व संवर्धनावर केवळ १९ हजार २३0 रुपये खर्च केलेत. उर्वरित ५७ लाख ५८ हजार ३0३ रुपये नगरपालिकेने इतरत्र खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीवरून निष्पन्न झाले. आहे. नगरपालिका नागरिकांकडून वृक्ष कर वसूल करते. या रकमेतून नगरपालिकेने नव्याने वृक्षारोपण करून त्याचे संरक्षण व संवर्धन करावे, ही अपेक्षा असते. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंंगचा धोका लक्षात घेता, शासनाने वृक्ष लावण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विविध विभागांमार्फत शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. याशिवाय विविध सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालय यांच्यामार्फतसुद्धा वृक्षांचे महत्त्व पटवून देत, प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संरक्षण व संवर्धन करावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्था नागरिंकांकडून वृक्ष कर वसूल करून, या रकमेतून वृक्ष लागवड व त्याचे संरक्षण आणि संवर्धन करीत असते. तथापि, बुलडाणा नगरपालिकेने वर्षभरात नागरिकांकडून वसूल केलेल्या वृक्ष कराच्या रकमेतून जेमतेम रक्कम खर्च केली. ज्या प्रयोजनासाठी जनतेकडून नगरपालिका पैसा वसूल करते, त्यावर खर्च करण्याऐवजी पालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी दुसरीकडे केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सन २0१५ या एका वर्षात पालिकेने सामाजिक वनीकरण विभागाकडून २ लाख २२ हजार ६२५ रुपयांची रोपे लागवडीसाठी खरेदी केल्याची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यात आली. एकीकडे दहा वर्षांंत वृक्ष लागवडीवर १९ हजार रुपये खर्च दाखविला जातो, तर दुसरीकडे २0१५ या एका वर्षात दोन लाखांची रोपे खरेदी केल्याचे दाखविले जात आहे. ही माहिती निव्वळ विसंगत आहे. प्रत्यक्षात पालिकेने वर्षभरात एकही झाड लावले नाही.