विविध करांपोटी १.८४ कोटी रुपये वसूल
By Admin | Updated: March 25, 2017 02:33 IST2017-03-25T02:33:53+5:302017-03-25T02:33:53+5:30
कर वसुलीसाठी ६0 नळ जोडणी बंद ; सात दुकानांना लावले सील

विविध करांपोटी १.८४ कोटी रुपये वसूल
उद्धव फंगाळ
मेहकर, दि. २४- मेहकर नगरपालिकेने शहरातील मालमत्ता कर व पाणीकर वसुलीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू केली आहे. मालमत्ता व पाणीकर न भरणार्यांच्या आतापर्यंंत ६0 नळ जोडण्या बंद केल्या असून, सात दुकानांना सील लावले आहे. मालमत्ता व पाणी करांचे जवळपास १ कोटी ८४ लाख रुपये वसुली झाल्याची माहिती नगरपालिकेने दिली आहे.
शहरातील जवळपास सर्वच कुटुंबाकडे गेल्या अनेक वर्षांंपासून मालमत्ता कर व पाणी कराची मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना नळाचे पाणी, रस्ते, पथदिवे, नाल्या साफसफाई आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. त्या मोबदल्यात नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीकर भरणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून बहुतांश कुटुंबाकडे मालमत्ता व पाणी कराची मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वेळेवर वसूल होत नसल्यामुळे नगरपालिकेला विकास करण्यासह इतर कामांमध्ये अडचणी येत असल्याने मुख्याधिकारी अशोक सातपुते, सुधीर सारोळकर, संतोष राणे, अजय चैताने, विकास महाजन, संजय गिरी, रतन शिरपूरकर, विलास जवंजाळ, पूजा खरात आदींनी शहरामध्ये करवसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कराचा भरणा करावा, यासाठी न.पा.चे पथक शहरातील प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन कर भरण्यासाठी जनजागृती करीत आहे. तसेच वेळप्रसंगी सक्तीची कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. नगरपालिकेने अचानकपणे सुरू केलेल्या या सक्तीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कारण सध्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती, महागाई, पिकांना भाव नाही, मजुरांना कामे नाहीत. त्यामुळे गोरगरीब जनता हैराण आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेची धडक मोहीम ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली, तरी नगरपालिकेने आतापर्यंंत १ कोटी ८४ लाख रुपये वसुली केली आहे.