पीक कर्जाच्या नावावर हडप केलेली रक्कम वसूल करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:45+5:302021-02-05T08:32:45+5:30

चिखली : अनुराधा नागरी सहकारी बँकेने पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली. ...

Recover the amount seized in the name of crop loan! | पीक कर्जाच्या नावावर हडप केलेली रक्कम वसूल करा !

पीक कर्जाच्या नावावर हडप केलेली रक्कम वसूल करा !

चिखली : अनुराधा नागरी सहकारी बँकेने पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली. परंतु मिळालेली रक्कम शेतकऱ्यांना न देता स्वत:च हडप करून शासनासोबतच शेतकऱ्यांनाही चुना लावला असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत महिला व बाल विकासमंत्री ना. यशोमती ठाकूर यांना चिखली येथे निवेदन देऊन अनुराधा अर्बन बँकेकडून हडप केलेली रक्कम वसूल करावी व या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

ना. यशोमती ठाकूर २३ जानेवारी रोजी चिखली दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात चिखली पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी अनुराधा नागरी सहकारी बँकेकडून २००६ ते २००८ दरम्यान कर्ज घेतले आहे. कर्जाची नियमित परतफेडदेखील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु, शेतकऱ्यांचे कर्ज थकीत नसताना अनुराधा नागरी सहकारी बँकेने खोटे रेकॉर्ड दाखवून केंद्र शासन, राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये कर्जमाफीचे मिळवले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर मिळाली असल्याने, ती शेतकऱ्यांना परत देणे गरजेचे होते. मात्र, अनुराधा बँकेच्या व्यवस्थापनाने रक्कम परस्पर लाटली व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप करण्यात आला आहे. या निवेदनावर रमेश अकाळ, अनमोल ढोरे, पांडुरंग मुरकुटे, प्रकाश ढोरे, अशोक अकाळ, राजू अकाळ, विष्णू मुरकुटे, दत्तात्रय ढोरे, अशोक ढोरे, देविदास मुरकुटे, हरिभाऊ गवई, भगवान ढोरे, पंढरी गोंधळे, अनिल अकाळ या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा !

शेतकरी बांधवांचे कोट्यवधी रुपये परस्पर लाटल्यामुळे काँग्रेस पक्षाचीही बदनामी होत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. परंतु राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर शासनाकडून घेतलेली रक्कम शेतकऱ्यांना परत दिल्यास, शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होणार असल्याने याप्रकरणी उचित कार्यवाही करून अनुराधा अर्बन बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडून रक्कम वसूल करून देण्याची मागणी या निवेदनाव्दारे शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Recover the amount seized in the name of crop loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.