पीक कर्जाच्या नावावर हडप केलेली रक्कम वसूल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:59+5:302021-02-05T08:31:59+5:30
चिखली : अनुराधा नागरी सहकारी बँकेने, पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली; ...

पीक कर्जाच्या नावावर हडप केलेली रक्कम वसूल करा!
चिखली : अनुराधा नागरी सहकारी बँकेने, पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली; परंतु मिळालेली रक्कम शेतकऱ्यांना न देता स्वत:च हडप केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री ना.यशोमती ठाकूर यांना चिखली येथे निवेदन देऊन हडप केलेली रक्कम वसूल करावी व या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
ना.यशोमती ठाकूर २३ जानेवारी रोजी चिखली दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात चिखली पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी अनुराधा नागरी सहकारी बँकेकडून २००६ ते २००८ दरम्यान कर्ज घेतले आहे. कर्जाची नियमित परतफेडदेखील शेतकऱ्यांनी केली होती; परंतु शेतकऱ्यांचे कर्ज थकीत नसताना अनुराधा नागरी सहकारी बँकेने खोटे रेकॉर्ड दाखवून केंद्र शासन, राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये कर्जमाफीचे मिळवले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर मिळाली असल्याने, ती शेतकऱ्यांना परत देणे गरजेचे होते; मात्र अनुराधा बँकेच्या व्यवस्थापनाने रक्कम परस्पर लाटली व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप करण्यात आला आहे. ना.ठाकूर सद्यस्थितीत काँगेसच्या कार्याध्यक्ष आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्कमंत्री असल्याने अनुराधा नागरी सहकारी बँकेचे सर्वेसर्वा राहुल बोंद्रे यांनी कर्जमाफीचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी बांधवावर अन्याय होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी ना.ठाकूर यांच्याकडे केली. निवेदनावर रमेश अकाळ, अनमोल ढोरे, पांडुरंग मुरकुटे, प्रकाश ढोरे, अशोक अकाळ, राजू अकाळ, विष्णू मुरकुटे, दत्तात्रय ढोरे, अशोक ढोरे, देवीदास मुरकुटे, हरिभाऊ गवई, भगवान ढोरे, पंढरी गोंधळे, अनिल अकाळ या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.