स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची शिफारस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:08 IST2018-12-31T18:08:11+5:302018-12-31T18:08:28+5:30
खामगाव: तालुक्यातील आवार येथे रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायम स्वरूपी रद्द करा, अशी शिफारस करण्यात आली.

स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची शिफारस!
खामगाव: तालुक्यातील आवार येथे रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायम स्वरूपी रद्द करा, अशी शिफारस करण्यात आली. यासंबंधीत प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला असून, यामध्ये गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
खामगाव तालुक्यातील आवार येथील स्वस्त धान्य दुकानदार एल.एस.गवई यांनी १७ डिसेंबर रोजी रेशन धान्याची उचल केली. मात्र, हे धान्य रेशन कार्ड धारकांना वितरीत न करता परस्पर विक्री केली. याप्रकरणी पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पुरवठा निरिक्षक व्ही.एम. भगत आणि गणेश बोंद्रे यांनी शुक्रवारी आवार येथील रेशन दुकानाची पाहणी केली. यामध्ये रेशनकार्ड धारकांना वितरीत करण्यासाठी धान्याची उचल करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, लाभार्थ्यांना धान्य देण्यात आले नसल्याचे उघडकीस आले. रेशन धान्याची अफरातफर करण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने, संबंधीत दुकानदाराचा स्वस्त धान्याचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ स्तरावर करण्यात आली.
धान्य मिळाले नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधीत रेशन धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर बाबी आढळून आल्या. धान्याची अफरातफर करण्यात आल्याचे दिसून आल्याने, या दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला.
- व्ही.एम. भगत, निरिक्षण अधिकारी, खामगाव.