कच्च्या मालाचे दर वाढले, मिठाईवरही दरवाढीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST2021-09-16T04:42:21+5:302021-09-16T04:42:21+5:30

मिठाईसाठी लागणारे दूध, साखर, सुका मेवा, केसर आदी साहित्यांचे दर गत दोन महिन्यांपासून वाढले आहेत. याचा फटका स्वीट मार्ट ...

Raw material prices have risen, and so has the price of sweets | कच्च्या मालाचे दर वाढले, मिठाईवरही दरवाढीचे संकट

कच्च्या मालाचे दर वाढले, मिठाईवरही दरवाढीचे संकट

मिठाईसाठी लागणारे दूध, साखर, सुका मेवा, केसर आदी साहित्यांचे दर गत दोन महिन्यांपासून वाढले आहेत. याचा फटका स्वीट मार्ट व्यावसायिकांना बसत आहे, परंतु गणेशोत्सव व महालक्ष्मी सणातही मिठाईची भाववाढ करण्यात आली नाही. आगामी काही दिवसांत कच्च्या मालाचे दर चढेच राहिले, तर नाइलाजास्तव मिठाईचे दरही वाढवावे लागतील, असे स्वीट मार्ट व्यावसायिक असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

असे आहेत मिठाईचे दर (किलोमध्ये)

मिठाई सध्याचा दर गणेशोत्सवाआधीचा दर

मलाई पेढा ४०० ४००

केशर पेढा ४०० ४००

मोतीचूर लाडू २४० २४०

काजूकतली ८०० ८००

ड्रायफ्रुट बर्फी १००० १०००

...म्हणून वाढू शकतात दर

मिठाईचा अविभाज्य घटक असलेल्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले आहेत. सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे.

- विशाल शेळके, स्वीट मार्ट चालक, बुलडाणा

मिठाई हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लवकर विक्री होणे गरजेचे असते. सध्या सर्वच कच्च्या मालाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव दर वाढू शकतात.

-राजेश कालावडीया, स्वीट मार्ट चालक

भेसळीकडे लक्ष असू द्या

सणासुदीच्या दिवसांत मिठाईमध्ये भेसळखोरीचे प्रमाण वाढते. खव्यामध्ये मैदा किंवा तत्सम पदार्थ मिसळून तयार केली मिठाई ग्राहकांच्या माथी मारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरावर नियंत्रण कोणाचे?

मिठाई किंवा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असली, तरी दरावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार या विभागाकडे नाहीत. त्यामुळे दर वाढत असतील, तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

साखर व दुधाचे भाव वाढलेले नसतानाही आमच्या भागात मिठाईचे भाव मात्र वाढलेले आहेत. सणासुदीच्या दिवसांत मिठाई खरेदी हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे महाग असली, तरी मिठाई खरेदी केलीच जाते.

- नारायण लवंगे, एक ग्राहक

मिठाई व इतर गोडधोड पदार्थांशिवाय सण साजरा केल्यासारखे वाटत नाही. गणपती, गौरी या मोठ्या उत्सवांमध्ये मिठाई खरेदी करावीच लागते. मिठाईचे दर मात्र नियंत्रणात असावे.

- विनायक भाग्यवंत, एक ग्राहक

Web Title: Raw material prices have risen, and so has the price of sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.