‘एनआरसी’, ‘सीएए’च्या विरोधात बुलडाण्यात तिरंगा यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 14:36 IST2020-01-28T14:36:28+5:302020-01-28T14:36:40+5:30
६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन इंदिरा नगर येथून करण्यात आले.

‘एनआरसी’, ‘सीएए’च्या विरोधात बुलडाण्यात तिरंगा यात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलडाण्यातही शाहीन बाग याच नावाने कुल जमाती तंझीमच्या नेतृत्वात साखळी उपोषणाची सुरू आहे. उपोषणाच्या १३ व्या दिवशी २६ जानेवारी रोजी बुलडाण्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली.
या तिरंगा यात्रेत हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात शाहिनबाग या नावाने साखळी उपोषणाची सुरूवात १७ जानेवारी पासून करण्यात आली आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन इंदिरा नगर येथून करण्यात आले. जवळपास १०० मिटर लांबीच्या तिरंग्याखाली हजारों समाज बांधवांच्या उपस्थितीत जोरदार घोषणेच्या जयघोषाने तिरंगा यात्रा इंदिरानगर येथून निघाली. नंतर संगम चौक, बस स्थानमार्गे जयस्तंभ चौक येथे पोहचल्यावर शाहीनबागच्या समोरील यात्रेचे रूपांतर एका जनसभेत झाले. यावेळी कुल जमाती तंझीमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, आपली लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात आहे.
आपल्या उपोषणामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुल जमाती तंझीमच्या वतीने करण्यात आले.
(प्रतिनिधी)