दीड महिन्यापासून पावसाची दडी
By Admin | Updated: August 3, 2015 01:25 IST2015-08-03T01:25:54+5:302015-08-03T01:25:54+5:30
पावसासाठी शेतक-याचे देवाला साकडे; गण गण गणात बोतचा शेकडो भाविकांनी केला जप.

दीड महिन्यापासून पावसाची दडी
मेहकर (जि. बुलडाणा): गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. दरम्यान, येथील गजानन महाराज मंदिरात ३१ जुलै रोजी गजानन महाराज सेवा समितीच्यावतीने शेकडो भाविकांनी गण गण गणात बोतचा सामूहिक जप करून गजानन महाराजांकडे पावसासाठी साकडे घातले. तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस फिरकला नसल्याने खरीप पीक करपायला लागले आहे. मागील वर्षीसुद्धा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात होते. यावर्षी पुन्हा पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. गत वर्षीच्या दुष्काळाची शे तकर्यांना पाहिजे तशी मदत मिळाली नाही. त्यामुळे यावर्षी शेतकर्यांनी पेरणीसाठी बँकांकडून, सावकारांकडून, तर वेळप्रसंगी काहींनी महिलांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून महागडे खते व बियाणे खरेदी करून पेरणी पूर्ण केली; परंतु पावसाने दडी मारल्याने खरीप पीक करपायला लागले आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी करपलेल्या पिकांमध्ये वखर टाकून, तर काहींनी जनावरे सोडून पिके मोडून काढली आहेत. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दरम्यान, पावसासाठी गावोगावी धोंडी काढून ग्रामदेवतांना साकडे घातले जात आहे. येथील गजानन महाराज मंदिरातही गजानन महाराज सेवा समितीच्यावतीने अध्यक्ष श्याम उमाळकर यांच्यासह परिसरातील शेकडो भाविकांनी गण गण गणात बोत या मंत्राचा सामूहिक जप करून पावसासाठी साकडे घातले. दरम्यान डोणगाव परिसरातील नागरिकांनीही पावसासाठी देवाला साकडे घातले.