पीक विम्याची मदत त्वरित मिळावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:50 IST2016-07-21T00:50:24+5:302016-07-21T00:50:24+5:30

पीक विम्याच्या रकमेबाबत राहुल बोंद्रे यांनी कृषिमंत्री फुंडकरांकडे मागणी.

Quick help should be available for crop insurance. | पीक विम्याची मदत त्वरित मिळावी!

पीक विम्याची मदत त्वरित मिळावी!

चिखली (जि. बुलडाणा): बुलडाणा जिल्हय़ातील प्रमुख पीक असलेले कापूस व चिखली मतदारसंघातील रायपूर महसूल मंडळातील सोयाबीन व तूर पिकांना पीक विमा अनुदानातून वगळून सरकारने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांची एकप्रकारे चेष्ठा केली आहे. शेतकर्‍यांची ही क्रूर चेष्ठा थांबवून संपूर्ण जिल्हय़ात कापूस आणि रायपूर मंडळातील सोयाबीन व तूर या पिकांचा समावेश करून शेतकर्‍यांना तत्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. पांडुरंग फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हय़ातील सुमारे ३ लाख ६३ हजार २४६ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असून, यापैकी केवळ २ लाख ७६ हजार ९0८ शेतकर्‍यांनाच पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे. तसेच रायपूर महसूल मंडळातील सुमारे ३ हजार ५00 शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाच्या विम्याचा ३0 लाख रुपये भरणा केला आहे, तर सुमारे ७00 शेतकर्‍यांनी तूर पिकाचा १२ लाख रुपये पीक विमा भरला आहे. एकीकडे ही परिस्थिती, तर दुसरीकडे नापिकीमुळे प्रचंड प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. जिल्हय़ात अनेक शेतकरी हे नगदी पीक घेतात. सदर पिकाला खर्चही जास्त प्रमाणात येतो. गत वर्षाचे हवामान व दुष्काळी परिस्थितीमुळे अल्प प्रमाणात कपाशीचे उत्पन्न शेतकर्‍यांना झाले.. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पीक विमा मिळेल, या आशेवर अनेक शेतकरी धीर धरून होते, मात्र प्रमुख पिकांना पीक विमा मदतीतून बाद केल्याने शेतकरी प्रचंड निराश झाले असून, शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या प्रमुख पिकांना पीक विम्यातून बाद केल्यामुळे शेतकर्‍यांची क्रूर चेष्ठा होत असल्याचा आरोप आ. बोंद्रेंनी केला असून, या प्रकाराने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाभरात प्रमुख पीक असलेला कापूस व तूर आणि सोयाबीन पिकांचा पीक विम्यात तत्काळ समावेश करण्यात यावा व मदतीचे वाटप करण्यात यावे, अन्यथा काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आ.राहुल बोंद्रे यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री ना. फुंडकर यांना दिला आहे.

Web Title: Quick help should be available for crop insurance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.