पुसद अर्बन बँकेचे एटीएम फोडले
By Admin | Updated: October 17, 2015 01:41 IST2015-10-17T01:41:30+5:302015-10-17T01:41:30+5:30
चिखली येथील घटना; चोरट्यांनी केले ३ लाख ८४ हजार लंपास.

पुसद अर्बन बँकेचे एटीएम फोडले
चिखली (जि. बुलडाणा) स्थानिक डी.पी. रोडवरील पुसद अर्बन को-ऑप. बँकेचे एटीएम अत्यंत शिताफीने फोडून त्यातील ३ लाख ८४ हजार रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. स्थानिक डी.पी. रोडवर पुसद अर्बनच्यावतीने एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एटीएम मशीनमधील ३ लाख ८४ हजार ८00 रुपये १0 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत शिताफीने लंपास केले आहेत. या चोरीचा थांगपत्ताही चोरट्यांनी लागू दिलेला नाही. विशेष एटीएम फोडणार्यांनी मशीनची कोणतीही तोडफोड न करता सर्व तांत्रिक बाबी व्यवस्थितपणे हाताळून आतील सर्व रोकड लंपास केली आहे. दरम्यान, ही चोरी एटीएमची संपूर्ण तांत्रिक माहिती असणार्यांकडून झालेली असल्याने बँक प्रशासनाने प्रथम आपल्या पातळीवर या चोरीचा छडा लावण्यासाठी सर्व अंतर्गत बाबी तपासून पाहिल्या; मात्र यातून काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर तब्बल ६ दिवसानंतर पुसद अर्बनचे शाखा व्यवस्थापक नितीन एस. लांडे यांनी याबाबत चिखली पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी कलम ३८0, ४६१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, तपास हा ती घेतला आहे.