प्रचारतोफा आज थंडावणार

By Admin | Updated: October 13, 2014 01:03 IST2014-10-13T01:03:46+5:302014-10-13T01:03:46+5:30

प्रमुख पक्षांची प्रतिष्ठाही पणाला : मतदानाला उरले फक्त दोन दिवस.

Promotions will stop today | प्रचारतोफा आज थंडावणार

प्रचारतोफा आज थंडावणार

बुलडाणा : मागील १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार आहेत. बुधवार १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये कोठे बहुरंगी तर कोठे पंचरंगी लढतीचे चित्र आहे. निवडणुकीच्या अंतिम चरणात प्रचारामध्ये चांगलीच चुरस वाढली होती. मागील दोन दिवसात तर सर्वच उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रचाराचे अस्त्र बाहेर काढून वातावरण निर्मिती केली. दरम्यान, सर्वच मतदारसंघात जातीय समीकरणामुळे मतविभाजन होण्याची शक्यता असल्याने कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांसह सामान्य मतदारसुद्धा संभ्रमात आहे.
बुलडाणा विधानसभा मतदार संघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आणि मनसे अशी चौरंगी लढत येथे होत आहे. आघाडी व महायुती तुटल्यानंतर भाजपचे तिकीट घेऊन योगेंद्र गोडे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने सुरुवातीपासूनच बुलडाण्यात चुरस वाढली होती. गोडे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे विजयराज शिंदे यांनीही तोडीस तोड प्रचार यंत्रणा राबविली. तर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुप्त प्रचार यंत्रणेमुळे सपकाळ यांचा इतरांनी धसका घेतला आहे. मनसेचे संजय गायकवाड हे यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी ते दोन वेळा अपक्ष म्हणून रिंगणात होते. गायकवाड यांनाही प्रचारात धडका उडवून दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके यांच्या उमेदवारीने येथील लढत बहुरंगी झाली आहे.
सर्वच मतदारसंघात अतिशय प्रभावीपणे प्रचार होत असल्यामुळे लढत चुरशीची झाली आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी रॅली व प्रचारसभांचे आयोजन केले असल्याने आजचा दिवस हा राजकीयदृष्ट्या प्रचारांची सर्वात मोठी रणधुमाळी उडविणारा ठरणार आहे.

Web Title: Promotions will stop today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.