जिल्ह्यात मिळतेय रेशीम शेतीला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST2021-06-01T04:26:18+5:302021-06-01T04:26:18+5:30
रेशीम शेतीमधील कीटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात; परंतु यावर्षी प्रतिकूल परिस्थितीसुद्धा मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील ११ शेतकऱ्यांनी ...

जिल्ह्यात मिळतेय रेशीम शेतीला चालना
रेशीम शेतीमधील कीटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात; परंतु यावर्षी प्रतिकूल परिस्थितीसुद्धा मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील ११ शेतकऱ्यांनी मनरेगाअंतर्गत रेशीम कीटक संगोपन घेत यशस्विपणे ते पूर्णही केले. अंदाजे ६५० ते ७०० किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. २०२०-२१ मध्ये कल्याणा येथील युवा शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचे ठरविले. या ११ लाभार्थ्यांनी रेशीम अधिकारी कार्यालयात नोंदणी केली. जून २०२० मध्ये तुती लागवड रोपांद्वारे करून नोव्हेंबर २०२० मध्ये रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. पहिले पीक हिवाळ्यात घेतले, परंतु पहिले पीक, त्यात ऋतुमानानुसार येणाऱ्या अडचणींमुळे सरासरी उत्पन्न मिळाले. परंतु इतक्यावरच समाधान न मानता उन्हाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत रेशीम कीटक संगोपन घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी संगोपन गृहाच्या नेटला पोते बांधून ड्रीपच्या पाईपने पाणी सोडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी गणेश ऊर्फ राजू नरहरी ठाकरे यांनी संगोपनगृहाशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर सिंटेक्स टाकी चढवली व त्यातून ठिबकच्या पाईपद्वारे पाणी पोत्यांवर सोडले. बुलडाणा येथील जगदीश गुळवे यांच्याकडून बाल कीटक (चॉकी म्हणजे दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम कीटक) घेतले. सर्वांनी मेहनतीने, जिद्द व चिकाटीने कीटक संगोपन पूर्ण केले. सर्वांचे रेशीम कोष तयार झाले असून कोष विक्रीसाठी १५ दिवसांत तयार झाले आहेत. त्याचा फायदा नक्कीच या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
दीड ते दोन लाखाचे उत्पन्न
११ शेतकऱ्यांना अंदाजे ६५० ते ७०० कि. ग्रॅम कोष उत्पादन झाले आहे. सध्या २८० ते ३१० रुपये प्रति कि.ग्रॅम दर असून त्यांना १.५ लक्ष ते २ लक्ष रूपये उत्पन्न १५ दिवसांच्या मेहनतीने त्यांना नक्कीच मिळणार आहे. या यशस्वी संगोपनाचे श्रेय ते सहायक संचालक महेंद्र ढवळे व रेशीम विकास अधिकाऱ्यांना देतात.