प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले जिगावचे काम!
By Admin | Updated: April 21, 2016 02:00 IST2016-04-21T02:00:27+5:302016-04-21T02:00:27+5:30
वर्षभरात चौथ्यांदा काम बंद; आधी पुनर्वसन व मोबदल्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी.

प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले जिगावचे काम!
नांदुरा (जि. बुलडाणा) : यापूर्वी वर्षभरात प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे सतत तीन वेळा बंद पडलेल्या जिगाव प्रकल्पाच्या गेटच्या पायाचे काम २0 एप्रिल रोजी जिगाव परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले. प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी जावून काम करणार्या मजूर व ठेकेदारांच्या कर्मचार्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना काम बंद करण्याबाबत ठणकावले व प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित घराच्या व शेतीच्या मोबदल्याचे वितरण प्रथम करावे व नंतर कामाला प्रारंभ करावा, अशी मागणी करीत काम बंद पाडले. आधीच मागील तीन दशकांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा ग्रहण लागले असून, शासनाचेही ठोस धोरण नसल्याने यावर्षी या प्रकल्पाचे काम सुरु कमी दिवस व बंदच जास्त दिवस राहत आहे.
आधी पुनर्वसन मग धरण, हे प्रकल्प राबविण्याचे शासकीय धोरण आहे; मात्र जिगाव प्रकल्पाबाबत पुनर्वसनाच्या कामाची तसेच शेती व घरांचा मोबदला देण्याची कासवगती कायम आहे. आज रोजीही पहिल्या टप्प्यातील गावचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्रस्त झालेले प्रकल्पग्रस्त त्यांच्या घराच्या व शेतीच्या मोबदल्यासाठी वारंवार आंदोलन करीत आहेत. सुमारे आठ दिवसांपूर्वी आडोळ येथील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले होते.