चार महिने उलटूनही बँकांतील रक्कम मिळण्यास अडचणी

By Admin | Updated: April 20, 2017 23:57 IST2017-04-20T23:57:06+5:302017-04-20T23:57:06+5:30

चिखली: नोटबंदीचा निर्णय होऊन चार महिने उलटले तरीही शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमधील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. वेळेत पैसे मिळत नसल्याने ग्राहक सैरभैर झाले आहेत.

Problems in getting bank fund even after four months of reversal | चार महिने उलटूनही बँकांतील रक्कम मिळण्यास अडचणी

चार महिने उलटूनही बँकांतील रक्कम मिळण्यास अडचणी

एटीएमसह बँकांमध्येही ठणठणाट

चिखली: नोटबंदीचा निर्णय होऊन चार महिने उलटले तरीही शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमधील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. वेळेत पैसे मिळत नसल्याने ग्राहक सैरभैर झाले आहेत. त्यात शहरातील स्टेट बँकेचे एटीएम वगळता इतर सर्वच एटीएम गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने ग्राहकांमागील शुल्ककाष्ट अद्याप संपलेले नाही. तर सद्यस्थितीत लग्नसराई असतानासुद्धा ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्थेत अडकलेला सर्वसामान्य नागरिक खरोखरीच कॅशलेस झाला असल्याने याचा विपरीत परिणाम बाजारपेठेतील व्यवहारांवर झाला आहे. याशिवाय बँकांमध्येही व्यवहारासाठी तब्बल दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच आता व्यवहारावरील मर्यादा उठविण्यात आली असली तरी ग्राहकांना पैसे देण्यासाठी बँकांकडेही रक्कम नसल्याने आज होईल, उद्या होईल या आशेवर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांची पुरता भ्रमनिरास झाला आहे.
चिखली शहरात स्टेट बँक, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा या राष्ट्रीयीकृत बँकांसह चिखली अर्बन बँक, देवगिरी नागरी पुसद अर्बनद्वारेही एटीएम सेवा पुरविण्यात येते; मात्र नोटाबंदीनंतर यातील केवळ स्टेट बँकेचे मुख्य शाखेजवळील एटीएम आणि बसस्टँड रोडवरील एटीएम या दोनच एटीएममधून रक्कम निघत असल्याने या दोन्ही ठिकाणी एटीएममध्ये रक्कम टाकताच ती संपेपर्यंत मोठी झुंबड उडालेली असते. त्यातही नियमितपणे रक्कम टाकल्या जात नाही तसेच बसस्टँड रोडवरील एटीएम केंद्रातील एक मशीन नेहमी हँग होत असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. तर इतर बँकांपैकी अ‍ॅक्सिस बँक, देवगिरी नागरी व चिखली अर्बन बँकेच्या एटीएममध्ये महिन्यातून एखादवेळा रक्कम टाकल्या जात असून, याव्यतिरिक्त इतर सर्वच एटीएम बंद राहत असल्याने शहरातील एकूण एटीएम सेवेचे पूर्णत: तीन तेरा वाजले आहेत. दरम्यान, नोटबंदीनंतर विस्कळीत झालेला येथील बँकिंग कारभार अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. शहरातील प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवहारांसाठी बँक उघडण्यापूर्वीपासूनच भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. एका व्यवहारासाठी तब्बल दीड ते दोन तास ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागत आहे.
दरम्यान, मार्चनंतर बँकांकडेही रोख रक्कम उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. अनेक बँकांमध्ये ग्राहकांना अक्षरश: रद्दीत विकल्या जाणार नाहीत असे १० रुपयांचे बंडल देऊन बोळवण होत आहे.

कॅशलेसला प्राधान्य द्यावे!
शहरातील विविध व्यवसायिक कॅशलेस व्यवहार करण्यास नाखूश असून, स्वाइप मशीन असूनही रोकड देण्याचा आग्रह केला जातो. कारण स्वाइप मशीनद्वारे केलेल्या व्यवहाराला कर लावला जातो. त्यामुळे रोख व्यवहारांचे प्रमाण अधिक आहे. या परिस्थिमुळे बँकेतून रोकड काढण्यावर निर्बंध आले आहेत. केंद्र शासनाद्वारे कॅशलेस व्यवहारांवर कर आकारला जातो. तर रोखीने व्यवहार केल्यास बचत होते. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी करांमध्ये सूट मिळणे आवश्यक आहे. खात्यावर २ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास आयकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, या धाकाने अनेक खातेदार खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास नाखूश आहेत.

खातेदारांमध्ये गैरसमज
नोटाबंदीनंतर बँक खातेदारांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झाले आहेत. बँक खात्यातील २ लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास चौकशी होते, असा समज पसरला आहे. तसेच अनेक बँकांमध्ये रोख व्यवहारांसाठी केवळ एकच काउंटर असल्याने तब्बल दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे रांगांचा वैताग आल्याने, खात्यात पैसे ठेवण्याऐवजी रोकड बाळगण्याकडे नागरिकांचा कल आहे.

Web Title: Problems in getting bank fund even after four months of reversal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.