शेतक-यांच्या समस्यांसाठी दबावगट
By Admin | Updated: November 9, 2014 23:29 IST2014-11-09T23:29:35+5:302014-11-09T23:29:35+5:30
कापूस खरेदी, संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बुलडाणा जिल्ह्यात दबावगट.

शेतक-यांच्या समस्यांसाठी दबावगट
राजेश शेगोकार/ बुलडाणा
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता जवळपास पंधरवडा संपत आला. सरकार अस्तित्वात आले; मात्र ते वैध की अवैध, पाठिंबा कुणाचा, मंत्री कोण, विस्तार कधी, अशी सारी प्रश्नांची मालिका संपता संपेना. नव्या सरकारच्या पक्षाला नव्या संसाराचे कौतुक व संसार मांडण्याची घाई, जुन्या सत्ताधार्यांना अजूनही कोंडी फोडण्याचा मार्ग सापडत नाही. अशा स्थितीत कापूस खरेदी, दुष्काळाच्या मदतीचे निकष ठरविणारी आणेवारी व संभाव्य पाणीटंचाई हे प्रश्न प्रामुख्याने उभे ठाकले आहेत. या प्रश्नांसाठी बुलडाण्यात आता राजकीय दबावगट उभे राहत असल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे. आणेवारीच्या बाबतीत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पुढाकार घेत सर्वच पक्षाच्या आमदारांसह जिल्हाभरातील लहान-मोठय़ा संस्थांमधील लोकप्रतिनिधींना पत्र लिहून जागृत करीत थेट राज्यपालांचा दरवाजा ठोठावला, तर आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी चक्क अमरावती विभागीय आयुक्तांनाच थेट शेतात नेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली. खासदार प्रतापराव जाधव असोत की सर्व आमदार किंवा जि.प. अध्यक्ष असोत प्रत्येकाने आणेवारीचा प्रश्न लावून धरला. आमदार डॉ. संजय कुटे यांनी कापूस खरेदीची कोंडी सोडविण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या दालनातच प्रश्न मांडून १५ तारखेचा मुहूर्त काढून घेतला. हे सर्व चित्र आशादायक आहे. बुलडाण्याच्या प्रश्नांवर असा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अशी प्रभावी भूमिका घेतली तर येणार्या काळात बुलडाण्याचा राजकीय दबाव गट हा समस्यांचा अनुशेष संपवेल, अशी आशा करायला हरकत नाही.