सहा लाखावर विविध रोपे तयार
By Admin | Updated: July 6, 2014 23:31 IST2014-07-06T22:48:47+5:302014-07-06T23:31:20+5:30
पावसाची प्रतीक्षा :लागवडीसाठी सामाजिक वनीकरण सज्ज

सहा लाखावर विविध रोपे तयार
खामगाव: सामाजिक वनिकरण विभागाने यावर्षीही वृक्षारोपणासाठी तयारी म्हणून जिल्ह्यातील १२ ठिकाणी असलेल्या रोपवाटिकांमध्ये विविध ८४ प्रजातींची ६ लाखाचेवर विविध वृक्षाची रोपे तयारी केली आहेत. मात्र अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने ही रोपे सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकांमध्ये पडून आहेत. त्यामुळे लवकर पाऊस पडून वृक्षारोपणाची प्रतीक्षा लागली आहेत.
पर्यावरणाचा वाढता असमतोल पाहता आजरोजी वृक्षारोपण अतिमहत्त्वाचे ठरत आहे. त्यासाठी शासनासोबतच राष्ट्रीय हरित सेना व इतर विविध सामाजिक संघटना पुढाकार घेतात. हा पुढाकार पाहता वृक्षारोपणासाठी खाजगी रोपवाटिकांसोबतच शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, महामार्ग दुतर्फा वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रामुख्याने सामाजिक वनीकरण विभागावर असते. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्याअगोदर सामाजिक वनीकरण विभागाकडून लाखोच्या संख्येत वृक्षरोपे तयार करण्यात येतात. यावर्षीही सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील नांदुरा वगळता १२ तालुक्यात असलेल्या रोपवाटिकांमध्ये उंबर, वड, पिंपळ, बाभूळ, अंजन, चिंच, रिठा, आंबा अशी सावलीची तसेच फळझाडे अशा ८४ प्रजातींची रोपे तयार झाली आहेत. मोठी ५ ते ६ फूट उंचीची १ लाख ६८ हजार ३0३ तर १ ते २ फूट उंच झालेली ४ लाख ६२ हजार ५६४ अशी एकूण ६ लाख ३0 हजार ८६७ वृक्षरोपे तयार आहेत. मात्र यावर्षी जून महिना पावसाविना उलटला असून जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटत असताना जिल्ह्यात तसेच सर्वत्रच अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे आतापर्यंत वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेतून वृक्षरोपे कोणीही नेली नाहीत.
वृक्षरोप जगून चांगल्या पध्दतीने वाढ होण्यासाठी पावसाचे पाणी आवश्यक असते. त्यामुळे वृक्षारोपणासाठी पाऊस पडण्याची वाट पाहण्यात येते.