पावसाच्या विलंबानंतरही शेतकर्यांचे कापसालाच प्रधान्य
By Admin | Updated: August 8, 2014 00:30 IST2014-08-07T22:09:19+5:302014-08-08T00:30:21+5:30
सोयाबीनच्या पेर्यात वाढ, मक्यात मोठी घट

पावसाच्या विलंबानंतरही शेतकर्यांचे कापसालाच प्रधान्य
जळगाव: तालुक्यात तब्बल एक महिना पाऊस उशीरा येवूनही शेतकर्यांनी नगदी पीक असलेल्या कापूस पिकाला प्राधान्य देत मागीलवर्षीपेक्षा कपाशीचा पेरा ४४६ हेक्टरने जास्त केला. तर सोयाबीनच्या पेर्यातही अकराशे हेक्टरची वाढ झाली आहे. तुलनेत मागील वर्षी भाव न मिळाल्याने यावर्षी मका पिकाचा पेरा निम्म्यावर आला आहे. जुलै अखेरपर्यंत सरासरी ३४६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून वर्षभरात अपेक्षित पावसापेक्षा हा पाऊस निम्मे झाला आहे.
जळगाव तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ५0८0४ हेक्टर असून लागवडीखालील क्षेत्र ४१ हजार ९0२ हेक्टर आहे. मागीलवर्षी १९0८८ हेक्टर कापसाचा पेरा झाला होता. त्यामध्ये यावर्षी ४४६ हेक्टरची वाढ होवून १९ हजार ५३४ हेक्टर कापसाची लागवड झाली आहे. वास्तविक यावर्षी तब्बल एक महिना उशीरा म्हणजे १५ जुलैनंतर पेरणीला सुरूवात झाली. कापसाची उशीरा लागवड झाल्यास झडती मिळत नाही असा शेतकर्यांचा समज असूनही मागील वर्षी कापसाचे झालेले विक्रमी पीक आणि तुलनेत शेवटी मिळालेला योग्य भाव या पृष्ठभुमीवर शेतकर्यांनी या नगदी पिकाला यावर्षीही प्राधान्य दिले आहे. लागवडीखालील एकुण क्षेत्रफळापैकी निम्मे क्षेत्रफळावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनच्या लागवडीतही दरवर्षी वाढ होत आहे. मागीलवर्षी सोयाबीनचा पेरा ८ हजार ६३९ हेक्टर होता. त्यामध्ये अकराशे हेक्टरची वाढ होवून यावर्षी ९ हजार ७३६ हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. मका पिकाच्या लागवडीकडे यावर्षी शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. मागीलवर्षी तालुक्यात ३ हजार २0९ हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी फक्त १ हजार ५४५ हेक्टरवरच मका पेरला गेला. मागीलवर्षी मक्याला योग्य भाव न मिळाल्याने या पिकाला प्राधान्य मिळाले नाही. मुंगाच्या पेर्यातही ५00 हेक्टरची घट झाली आहे. मागीलवर्षी हा पेरा २ हजार १२१ हेक्टर होता. यावर्षी १ हजार ६३५ हेक्टरवरच मुंग लागवड झाली आहे. उडीदाचा पेरा मात्र कायम आहे. सुमारे १५00 हेक्टरवरच या पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागीलवर्षी तुरीचा पेरा ३0१२ हेक्टर होता यावर्षी ४00 हेक्टरने कमी करून तो २ हजार ६१५ वर आला आहे. ज्वारीचा पेरा यावर्षी २ हजार १३५ हेक्टर आहे. मागील वर्षी १00 हेक्टरने जास्त लागवड होती.