डोणगाव येथील शेलगाव पारपासून माळीपारपर्यंत रस्ता फोडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या कामाला सरळ विनापरवाना विद्युत कनेक्शन घेऊन रोड फोडण्याचे काम सुरू होते. यात विशेष म्हणजे, खांबावरून वीज जोडणी करून देणारा तो कोण की, या कामाला विद्युत वितरण विभागाची मूक संमती होती, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. डोणगाव येथे लोणी गवळी रस्ता ते महात्मा फुले पार या भागात फायबर केबल टाकण्याचे सुरू आहे. यात शेलगाव पार ते महात्मा फुले पार हा सिमेंट रस्ता व्हायब्रेटर मशिनीने फोडून केबल टाकण्यात येणार आहे. त्याची सुरुवात चार दिवस अगोदर झाली. अशात या कामासाठी जी वीज लागणार होती, त्यासाठी विद्युत वितरण विभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, येथील कामासाठी कोणतीही परवानगी न घेता, सरळ विद्युत पोलवरून वीज जोडणी करून घेण्यात आली. विशेष म्हणजे, टाकलेला केबल हा आकडा नसून, सरळ विद्युत तारांवर जोडलेला होता, ज्याने ही अवैध विद्युत जोडणी कोणी करून दिली. विद्युत खांबावरून कनेक्शन जोडणीसाठी अगोदर लाइन बंद करून ते वीज कनेक्शन जोडावे लागते. अशात ती वीज जोडणी करून देणारा तो कोण, असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत.
अखेर विद्यूत पुरवठा खंडित
अवैध विद्युत जोडणीप्रकरणी अभियंता ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी येथील लाइनमॅन संदीप गव्हांदे यांना पाठवून तो विद्युत पुरवठा खंडित केला. मात्र, चोरीची वीज वापरून काम केल्याप्रकरणी संबंधित केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर काय कार्यवाही झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही. अवैध विद्युत जोडणी करून देणारा तो कोण, हेही गुलदस्त्यात आहे, तर केबल टाकण्याचे काम हे ग्रामपंचायतीच्या सिमेंट रस्ता फोडून करण्यात येत असल्याने, हा रस्ता फोडण्याची परवानगी ग्रामपंचायतीने वरिष्ठ स्तरावरून घेतली का नाही, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
आम्ही कोणालाही रस्ता फोडण्यासाठी विद्युत कनेक्शन दिलेले नाही. जे अवैध कनेक्शन होते, त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल व दंडात्मक कारवाईही करण्यात येईल.
- नीलेश ठाकरे, अभियंता, विद्युत उपकेंद्र, डोणगाव.